नवी दिल्ली : न्यूझीलंडचा फलंदाज केन विल्यम्सन आयपीएलमधील स्थानिक खेळाडूंच्या प्रतिभेने खूपच प्रभावित झाला आहे. सनरायजर्स हैदराबादकडून तो ‘आयपीएल’मध्ये पदार्पण करणार आहे.‘सनरायजर्स’कडे शिखर धवन, ईशांत शर्मा, नमन ओझा यांच्यासह परवेज रसूल, कर्ण शर्मा, लोकेश राहुल यांच्यासारखे प्रतिभावान खेळाडू आहेत. तसेच डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली रवी बोपारा, इयान मॉर्गन, डेल स्टेन, ट्रेंट बोल्ट व विल्यम्सन हे परदेशी खेळाडू आहेत. विल्यम्सनच्या मते परदेशी खेळाडूंना स्थानिक खेळाडूंकडून खूप काही शिकण्यासारखे आहे.तो म्हणाला, की या सर्व खेळाडूंना भेटून खूपच आनंद झाला आहे. यातील अनेकांना आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळताना पाहिले आहे. कित्येक जणांविरुद्ध खेळलोही आहे. त्यांच्यासमवेत खेळण्याची संधी मिळाल्याचा आनंद आहे. २०१०मध्ये विल्यम्सनने अहमदाबाद येथे कसोटी पदार्पण केले होते. मागील वर्षी चॅम्पियन लिगमध्ये तो नॉर्दर्न नाइट्सकडून खेळत होता. तो म्हणाला, की भारतात खेळणे नेहमीच आनंददाई असते. (वृत्तसंस्था)
आयपीएलमधील स्थानिक खेळाडूंमध्ये प्रचंड प्रतिभा -विल्यम्सन
By admin | Updated: April 9, 2015 01:15 IST