नवी दिल्ली : हॉकी इंडिया लीग (एचआयएल) स्पर्धेच्या झालेल्या लिलावामध्ये रांची रेज संघाने आॅलिम्पियन आणि भारतीय संघातील प्रमुख खेळाडू गुरबाज सिंगला तब्बल ६६ लाख रुपयांची (९९ हजार डॉलर) किंमत देऊन आपल्या संघात घेतले. बुधवारी नवी दिल्लीमध्ये झालेल्या या स्पर्धेच्या लिलावामध्ये दबंग मुंबई, दिल्ली वॉरियर्स, जेपी पंजाब वॉरियर्स, कलिंगा लान्सर्स, रांची रेज आणि उत्तर प्रदेश विजार्ड या संघांनी सहभाग घेत आपला संघ मजबूत करण्याचा प्रयत्न केला. यावेळी गुरबाज सिंगला सुमारे ६६ लाख रुपयांच्या किमतीमध्ये रांचीने आपल्या संघात सामील करुन घेतले. त्याचवेळी १८ वर्षीय हार्दिक सिंग या युवा खेळाडूसाठी लागलेली चढाओढ लक्षवेधी ठरली. जेपी पंजाब संघाने सुमारे २६ लाख रुपयांच्या किमतीमध्ये त्याला आपल्या चमूत दाखल केले. तसेच, विदेशी खेळाडूंमध्ये जर्मनीचा स्टार फॉरवर्ड ख्रिस्तोफर रुर यालाही रांची संघानेच खरेदी करताना ५० लाख रुपये खर्च केले. लिलावाच्या नियमानुसार प्रत्येक संघाकडे खेळाडूंवर खर्च करण्यासाठी प्रत्येकी सात लाख २५ हजार डॉलर्सची मर्यादा होती. रांची आणि पंजाब वॉरियर्स संघांनी आपल्या संघामध्ये फारसा काही बदल केला नाही. त्यामुळे लिलाव प्रक्रियामध्ये त्यांच्याकडे सर्वाधिक मर्यादा होती. या लिलावासाठी भारतीय गोलरक्षक सुशांत टिर्की आणि हॉलंडचे आंतरराष्ट्रीय खेळाडू जाप स्टाकमैन, मिक वान डेर वीरडेन आणि ओलिम्पिक सुवर्ण विजेता लुकास रोसी यांचाही समावेश होता. (वृत्तसंस्था)
गुरबाजला मिळाली ६६ लाखांची किंमत
By admin | Updated: November 17, 2016 02:09 IST