मेक्सिको सिटी : देशातील अव्वल तिरंदाज दीपिका कुमारी हिला कोरियाच्या चोई मिसून हिच्याकडून फायनलमध्ये पराभव पत्करावा लागला. त्यामुळे तिला तिरंदाजी वर्ल्डकप फायनलमध्ये रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. गेल्या पाच वर्षांतील दीपिकाचे हे चौथे रौप्यपदक आहे. या स्पर्धेत भारताने २ रौप्यपदके मिळवली.वर्ल्डकप स्पर्धेत पाचव्या वेळेस सुवर्णपदक जिंकण्याचा प्रयत्न करणारी भारतीय खेळाडू दीपिकाने या हंगामातील अखेरच्या स्पर्धेत चांगली सुरुवात करताना उपांत्यपूर्व फेरी आणि उपांत्य फेरीत सहज विजय मिळवला; परंतु अंतिम फेरीत कोरियन खेळाडू आणि टॉप सीड मिसूनकडून तिला २-६ असा पराभव पत्करावा लागल्याने तिला सुवर्णपदकापासून वंचित राहावे लागले.पहिल्या सेटमध्ये दीपिका आणि मिसून २९-२९ असे बरोबरीत होते; परंतु १९ वर्षीय कोरियन खेळाडूने पुढील सेटमध्ये दीपिकाच्या तुलनेत दोन अचूक नेम साधताना २९ नेमांच्या या सेटमध्ये ५-१ अशी आघाडी घेतली. अखेरीस भारतीय आणि कोरियन खेळाडूंत पुन्हा २८-२८ अशी बरोबरी झाली; परंतु सुरुवातीला आघाडी मिळवल्याने मिसूनला सुवर्णपदकावर कब्जा करता आला. सहाव्या मानांकित दीपिकाने उपांत्यपूर्व फेरीत कोरियाच्या तृतीय मानांकित कावानाका काओरी हिचा ६-४ आणि उपांत्य फेरीत चिएन यिंग हिचा पराभव केला होता. पुरुषांच्या गटात भारताच्या अभिषेक वर्माला कम्पाउंड गटात रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. (वृत्तसंस्था)
सलग चौथ्यांदा दीपिका सुवर्णपदकापासून वंचित
By admin | Updated: October 26, 2015 23:03 IST