सिलीगुडी : भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक विम कोव्हरमन्स यांनी वैयक्तिक कारण देत अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे़ त्यामुळे भारतीय खेळाडूंना आश्चर्याचा धक्का बसला आहे़ अनेक खेळाडूंनी राजीनाम्याच्या वृत्तावर विश्वास नसल्याचे मत व्यक्त केले आहे़ राष्ट्रीय संघाचा कर्णधार सुनील छेत्री याने कोव्हरमन्स यांच्या मार्गदर्शनाखाली गत काही वर्षांपासून टीमने प्रभावी कामगिरी केली आहे़ त्यांच्याकडून आम्हाला बरेच शिकायला मिळाले आहे़ त्यांनी राजीनामा दिला आहे, यावर माझा विश्वासच बसत नाही़ मात्र, त्यांनी राजीनामा देऊ केला आहे, यामागे नक्कीच काहीतरी कारण असेल़ त्यांना भविष्यासाठी माझ्या शुभेच्छा़ कोव्हरमन्स यांनी फिलिस्तीन विरुद्ध झालेल्या आंतरराष्ट्रीय मैत्रीय लढतीत पराभव स्वीकारावा लागल्यानंतर पत्रकार परिषद बोलावून सोमवारी वैयक्तिक कारणामुळे प्रशिक्षकपदाचा राजीनामा देऊन आश्चर्याचा धक्का दिला होता़ सुब्रत पॉल यालाही कोव्हरमन्स यांच्या राजीनाम्याने धक्का बसला आहे़ तो म्हणाला, त्यांच्या मार्गदर्शनात माझ्या खेळात कमालीची सुधारणा झाली़ एक गोलकिपर म्हणून त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला याबद्दल त्यांचे विशेष आभाऱ लेनी रॉड्रिगेज म्हणाला, कोव्हरमन्स यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तावर अजूनही माझा विश्वास बसत नाही़ त्यांनी घेतलेल्या अचानक निर्णयामुळे मी आश्चर्यचकित आहे़ भारतीय संघाचा स्ट्रायकर रॉबिन सिंह म्हणाला, कोव्हरमन्स यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला याचा खेद आहे़ त्यांनी अचानकपणे असा निर्णय घ्यायला नको होता, असेही रॉबिन म्हणाला़ कोव्हरमन्स यांनी २०१२ मध्ये भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षकपद स्वीकारले होते़ त्यापूर्वी त्यांनी अनेक वर्षे आयर्लंड संघाचे हायपरफॉर्मन्स निदेशक म्हणून काम पाहिले होते़ (वृत्तसंस्था)