नामदेव कुंभार
मुंबई, दि. १६ - मुंबई इंडियन्सने मागील लढतीत दिल्ली डेअरडेव्हिल्स संघावर ८० धावांनी धडाकेबाज विजय मिळवताना नवव्या इंडियन प्रीमियर लीगच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आपल्या आशा जिवंत ठेवल्या असल्या तरी इतर संघाच्या पराभवावर त्यांना प्लेऑफ मध्ये प्रवेश मिळणार आहे. मुंबई संघ १३ सामन्यात ७ विजय आणि ६ पराभवासह १४ गुण मिळवत गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी विराजमान आहे. मुंबईचा पुढील सामना बलाढ्य गुजरात लायन्स बरोबर आहे. या सामन्यात मुंबईला विजयाबरोबरच धावगती वाढवण्याचं आव्हान असेल. तर दिल्ली डेअरडेव्हिल्सचे आता ११ सामन्यांत १२ गुण झाले असून, तो पाचव्या स्थानी घसरला आहे. दिल्लीचे उर्वरीत ३ सामने पुणे, हैदराबाद आणि बँगलोर बरोबर आहेत.
कोलकाता, मुंबई, गुजरात, दिल्ली, आणि बंगलोर या प्रत्येक संघाला प्लेऑफ मध्ये स्थान पटकावण्याची संधी आहे. कोलकाताचे १२ सामन्यात ७ विजयासह १४ गुण आहेत. त्यांची आगामी लढत गुजरात आणि हैदराबाद संघाबरोबर आहेत. कोलकाताची धावगती + 0.373 अशी चांगली आहे. बंगलोरने १२ सामन्यात ६ विजयासाह १२ गुणांची कमाई केली आहे. त्यांचे उर्वरित सामने दिल्ली आणि पंजाब यांच्या बरोबर आहेत.
हैदराबाद संघाने १२ सामन्यात ८ विजय मिळवत प्ले ऑफमधील आपले स्थान पक्के केले असले तरी त्यांना त्यांचे स्थान अजून पक्के करण्यासाठी एक तरी विजय आवश्यक आहे. कोलकाता आणि दिल्ली यांच्यातील त्यांना एक सामना जिंकून स्पर्धेतील आपले आव्हन मजबूत करण्याचा इरादा असेल. आयपीएल ९ च्या सुरवातीलाच धमाकेदार कामगिरी करत आपल्या अभियानाची सुरवात केली होती. पण नंतर त्यांची कामगिरी निराशाजनक झाल्यामुळे ते अव्वल स्थानावरुन ५ व्या स्थानी पोहचले. गुजरातने १२ सामन्यात ७ विजयासह १४ गुण मिळवले आहेत. त्यांची पुढील लढत मुंबई आणि कोलकाता बरोबर असणार आहे.
तळाच्या स्थानावर असलेल्या पुणे आणि पंजाबचे प्रत्येकी २ सामने बाकी आहेत. पुणे आणि पंजाब एकमेंकाबरोबर भिडणार आहेत. तर अन्य दुसऱ्या सामन्यात पंजाब बंगलोरबरोबर आणि पुणे दिल्ली बरोबर लढणार आहे.
पुणे आणि पंजाबने जर दिल्ली आणि बंगलोरला पराभव केले तर त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपेल आणि मुंबईचे स्थान प्ले ऑफमध्ये फिक्स होईल.
त्यामुळे मुंबईचे पुढील भवितव्य पंजाब आणि पुणे संघाच्या विजयावर असू शकते.