सोच्ची (रशिया) : पाच वेळा जगज्जेता ठरलेल्या भारताच्या विश्वनाथन आनंदची नजर शनिवारपासून (दि. ८) सुरू होणाऱ्या विश्व बुद्धिबळ स्पर्धेच्या विजेतेपदावर असेल. एवढेच नव्हे, तर गेल्या वर्षी मॅग्नस कार्लसनकडून झालेल्या पराभवाचा वचपा काढून तो सहाव्यांदा विश्व चॅम्पियन होण्यासाठी बुद्धिबळाच्या सारिपाटासमोर बसेल. भारतीय स्टार असलेल्या विश्वनाथन आनंदने या वर्षी जबरदस्त प्रदर्शन करीत टीकाकारांना सडेतोड उत्तर दिले आहे. असे असले तरी त्याला ‘अंडरडॉग’ मानले जात आहे.मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा विश्वनाथन आंनदकडून विजयाची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे; कारण गेल्या वर्षी आनंदने सुरुवातीला संघर्ष केला होता. आनंदने कॅँडिडेट्स स्पर्धा जिंकत कार्लसनला आव्हान देण्याचा हक्क मिळवला होता.त्यानंतर टीकाकारांचे तोंड बंद करीत त्याने बिलबाओ फायनल मास्टर्स स्पर्धा जिंकली होती. दुसरीकडे, कार्लसनसाठी यंदा सहज तसेच सोपे आव्हान नसेल. असे असूनसुद्धा प्रदर्शनाच्या सरासरीवरून तो विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. नॉर्वेच्या या स्टार खेळाडूने या वर्षाच्या सुरुवातीला रॅपिड आणि ब्लित्झ स्पर्धा जिंकली आहे. त्यामुळे तो सर्व प्रकारांत चॅम्पियन ठरला आहे. या विजयाबरोबरच तो यंदा दोन स्पर्धांत दुसऱ्या स्थानावर राहिला आहे. त्यात सिक्वेलफिल्ड कपचा समावेश आहे. ज्यात तो विजेत्या फॅबियानो कारुना याच्यापेक्षा तीन गुणांनी पिछाडीवर होता. विद्यमान चॅम्पियन असल्याकारणाने कार्लसनवर अपेक्षांचे मोठे ओझे असेल. त्याच्यावर दबावही असेल. त्याचा फायदा आनंदला मिळू शकतो.(वृत्तसंस्था)
नजर जेतेपदाच्या षटकारावर
By admin | Updated: November 8, 2014 03:21 IST