नॉटिंगहॅम : आॅस्ट्रेलियाविरुद्ध उद्यापासून सुरू होणाऱ्या चौथ्या कसोटीद्वारे इंग्लंड अॅशेसवर पुन्हा कब्जा करण्याच्या निर्धाराने खेळणार आहे आणि ही कामगिरी करण्यासाठी ते एक पाऊल दूर आहेत.इंग्लंडला या वर्षी कसोटीत सलग दोन विजय मिळवता आलेले नाहीत. एप्रिलमध्ये वेस्ट इंडीजविरुद्धचा पहिला सामना अनिर्णीत ठेवल्यानंतर पुढील सात कसोटीत त्यांनी जय व पराजयाची चव चाखली आहे.एजबस्टन येथे तिसरी कसोटी जिंकून इंग्लंड मालिकेत २-१ ने पुढे आहे. याआधी त्यांना दुसऱ्या कसोटीत ४०५ धावांनी पराभव पत्करावा लागला होता. या कसोटीत आता त्यांना वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनची उणीव भासणार आहे. जेम्स अँडरसन याने एजबस्टन कसोटीत ४७ धावांत ६ गडी बाद केले होते; परंतु दुखापतीमुळे तो चौथा कसोटी सामना खेळू शकणार नाही.गेल्या तीन वर्षांत अँडरसन दुखापतीमुळे प्रथमच कसोटीतून बाद झाला आहे. त्याचबरोबर नॉटिंगहॅम येथील आठ कसोटीत ५३ बळींचा विक्रम तो पुढे सुरू ठेवू शकणार नाही. त्याने २0१३ मध्ये येथे इंग्लंडला १४ धावांनी विजय मिळवून देताना १० गडी बाद केले होते. अँडरसनची जागा डरहॅमचा वेगवान गोलंदाज मार्क वूड घेऊ शकतो; परंतु तोदेखील पायाच्या घोट्याच्या दुखापतीतून सावरला किंवा नाही हे पाहणे मनोरंजक ठरेल.आॅस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल जॉन्सननुसार अँडरसनच्या अनुपस्थितीत इंग्लंडची वेगवान गोलंदाजीची फळी निस्तेज होईल. तो म्हणाला, ‘‘त्यांच्यासाठी हे मोठे नुकसान आहे. त्याच्या जागी जो कोणी खेळेल त्यावर खूप दबाव असेल.’’दरम्यान, इंग्लंडचा सलामीवीर फलंदाज अॅडम लिथच्या खराब फॉर्मनंतरही तो संघात कायम असेल. त्याने गेल्या ६ डावांत फक्त ७२ धावा केल्या आहेत. अँडरसनच्या अनुपस्थितीत इंग्लंडच्या गोलंदाजी आक्रमणाची प्रमुख मदार ही स्टुअर्ट ब्रॉड याच्या खांद्यावर असेल. तो ३०० बळींपासून फक्त एका विकेटने दूर आहे.आॅस्ट्रेलियाचा कर्णधार मायकल क्लार्कवर खराब फॉर्ममुळे निवृत्ती घेण्याचा दबाव असेल. तिसऱ्या कसोटीत तो १० आणि ३ धावाच करू शकला. आतापर्यंत मालिकेत त्याला ६ डावात फक्त ९४ धावाच करता आल्या. खराब फॉर्म असणाऱ्या अॅडम व्होजेसच्या जागी राखीव फलंदाज शॉन मार्शला खेळवले जाऊ शकते.
अॅशेस खिशात घालण्यास इंग्लंड सज्ज
By admin | Updated: August 5, 2015 23:42 IST