डरबन : सलामीवीर डीन एल्गरने (११८) नाबाद शतकी खेळी केली, पण इंग्लंडला पहिल्या कसोटी सामन्यात तिसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या डावात ८९ धावांची आघाडी घेण्यापासून रोखण्यात अपयशी ठरला. दक्षिण आफ्रिका संघाचा डाव तिसऱ्या दिवशी उपाहाराला काही वेळ शिल्लक असताना २१४ धावांत संपुष्टात आला. यानंतर इंग्लंडने दुसऱ्या डावात ३ बाद १७२ अशी मजल मारुन एकूण २६१ धावांची आघाडी घेतली आहे. वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड व फिरकीपटू मोईन अली यांनी प्रत्येकी चार बळी घेत दक्षिण आफ्रिकेचा डाव गुंडाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. ब्रॉडने तेम्बा बावुमाचा (१०) त्रिफळा उडवत इंग्लंडला सकाळी पहिले यश मिळवून दिले. त्यावेळी दक्षिण आफ्रिका संघाने कालच्या ४ बाद १३७ धावसंख्येत काहीच भर घातली नव्हती. ब्रॉडने २५ धावांच्या मोबदल्यात ४ बळी घेतले. अलीने सलग दोन षटकांत दोन बळी घेतले. त्याने जे.पी. ड्युमिनी (२) आणि केली एबोट (०) यांना तंबूचा मार्ग दाखवला. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेची ७ बाद १५६ अशी अवस्था झाली होती. त्यानंतर डेल स्टेनने (१७) एल्गरला चांगली साथ दिली. या दोघांनी आठव्या विकेटसाठी ५४ धावांची भर घातली. अलीने स्टेनला बाद करीत ही भागीदारी संपुष्टात आणली. अलीने सलग १२ षटके गोलंदाजी करताना २४ धावांच्या मोबदल्यात ३ बळी घेतले. त्याने एकूण ६९ धावांत चार फलंदाजांना माघारी परतवले. स्टिव्हन फिनने नव्या चेंडूने दुसऱ्या षटकात चार चेंडूंच्या अंतरात दोन बळी घेत दक्षिण आफ्रिकेचा डाव गुंडाळला.धावफलक : इंग्लंड पहिला डाव ३०३. दक्षिण आफ्रिका पहिला डाव : जिल त्रि.गो. ब्रॉड ००, एल्गर नाबाद ११८, अमला झे. बेयरस्टॉ गो. ब्रॉड ०७, डिव्हिलियर्स झे. बेयरस्टॉ गो. ब्रॉड ४९, प्लेसिस त्रि.गो. अली ०२, बाऊमा त्रि.गो. ब्रॉड १०, ड्युमिनी झे. स्टोक्स गो. अली ०२, एबोट झे. टेलर गो. अली ००, स्टेन झे. व्होक्स गो. अली १७, पिएड झे. बेयरस्टॉ गो. फिन ०१, मॉर्कल झे. रुट गो. फिन ००. अवांतर (८). एकूण ८१.४ षटकांत सर्व बाद २१४. गोलंदाजी : ब्रॉड १५-६-२५-४, व्होक्स १४-१-२८-०, अली २५-३-६९-४, फिन १५.४-१-४९-२, स्टोक्स ९-१-२५-०, रुट ३-१-११-०.
इंग्लंडने मिळवली आघाडी
By admin | Updated: December 29, 2015 01:24 IST