भारताच्या दोन तरुण आणि अव्वल ग्रॅण्डमास्टर्समधील तिसऱ्या फेरीची ही लढत उत्कंठावर्धक ठरली. प्रारंभीच खेळलेल्या चाली पाहता सहजने या लढतीची जय्यत तयारी केल्याचे जाणवले. त्याने पांढऱ्या मोहऱ्यांनिशी प्रारंभ केला. विदितने त्याला आवडत्या सिसीलियन बचाव पद्धतीने उत्तर दिले. याविरुद्ध अप्रतिम चाली खेळत सहजने आपल्यापेक्षा सरस मानांकित प्रतिस्पर्ध्याला बुचकळ्यात टाकले होते. आज तो खेळलेला १० आणि ११व्या चाली बुद्धिबळ तज्ञांसाठी अभ्यासाचा विषय ठरावा. प्याद्याची जी-फोर आणि हत्तीची रूक एफ-वन या प्रचलित नसणाऱ्या चाली खेळून सहजने विदितसह हा डाव अभ्यासणाऱ्यांनाही विचार करायला भाग पाडले.१४ आणि २२व्या चालींत आपले दोन प्यादे विदितला बहाल करून सहजने आक्रमक इरादे स्पष्ट केले. त्याने सर्व शक्तीनिशी विदितच्या राजावर आक्रमण करण्याची व्युहरचना आखली होती. हे आक्रमण परतवून लावण्यासाठी विदितच्या बचावतंत्राचा कस लागला. त्याने आपल्या २ प्याद्यांचे बलिदान देत लढत अंतिम अवस्थेकडे नेली.डावाच्या अंतिम टप्प्यात सहज आणि विदित या दोघांकडेही प्रत्येकी एक हत्ती, एक उंट आणि चार प्यादी शिल्लक होती. डावात वर्चस्व गाजवूनदेखील विजयाची कुठलीही शक्यता नसल्याचे लक्षात आल्यावर सहजने ४०व्या फेरीअखेर बरोबरी मान्य केली. (लेखक फिडेचे मान्यताप्राप्त प्रशिक्षक आहेत)
सहज विरुद्ध विदित
By admin | Updated: October 9, 2014 03:46 IST