कोलकाता : महागड्या दुचाकी आणि आलिशान वाहने सुसाट वेगाने पळविण्यात तरबेज असलेला टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने मंगळवारच्या रात्री आलिशन कारकडे पाठ फिरवित झारखंड संघातील सहकाऱ्यांसोबत ‘रांची ते हावडा’ असा सेकंड एसी ट्रेनने प्रवास केला.द. पूर्व रेल्वेचा माजी कर्मचारी असलेल्या धोनीला ट्रेनमध्ये पाहून रेल्वेचे कर्मचारीदेखील अवाक झाले होते. विजय हजारे करंडक वन-डे क्रिकेट खेळण्यासाठी धोनी येथे आला आहे. धोनीने इन्स्टाग्राम अकाऊंटवर झारखंडच्या संघ सहकाऱ्यांसोबतचा एक फोटो पोस्ट केला. भारतीय कसोटी संघ आॅस्ट्रेलियाविरुद्ध पुण्यात कसोटीत व्यस्त आहे. (वृत्तसंस्था)धोनी कसोटीतून निवृत्त झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय सामन्यांपासून दूर आहे. राष्ट्रीय संघात सध्या धोनीचा समावेश नसला, तरी तो क्रि केटपासून काही दूर राहिलेला नाही. आगामी विजय हजारे स्पर्धेसाठी धोनीकडे झारखंडचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. धोनीचा आंतरराष्ट्रीय क्रि केटमधील करिश्मा सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे धोनीचे नेतृत्व झारखंडसाठी खूप उपयुक्त ठरेल यात काहीच शंका नाही. धोनीच्या उपस्थितीमुळे संघातील युवा खेळाडूंनाही प्रेरणा मिळेल.२००० च्या दशकात धोनी खडगपूर येथे २००१ ते २००४ दरम्यान दपूम रेल्वेत टीसी होता. त्यावेळचा त्याचा संघर्ष नुकताच रूपेरी पडद्यावर आला आहे. आज देशाचा सर्वांत यशस्वी कर्णधार राहिल्यानंतर त्याने सेकंड एसीत प्रवास करीत जुन्या आठवणींना उजाळा दिला. १३ वर्षांनंतर प्रवास करताना धोनीने कुठलीही विशेष सेवा मागितली नाही हे विशेष.दपूम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी संजय घोष यांनी दिलेल्या माहितीनुसार, झारखंड संघाने प्रवासासाठी विशेष कोच आरक्षित केला नव्हता. अन्य प्रवाशांसोबत माहीसमवेत २३ जणांचे बुकिंग होते. क्रिया योगी एक्स्प्रेसमध्ये धोनी रात्री ९ वाजून ४० मिनिटांनी दाखल झाला. हावडा स्टेशनवर सकाळी ६ वाजून ५० मिनिटांनी ही ट्रेन दाखल झाली. त्याआधी खडगपूर येथे पहाटे ४.१५ वाजता ही ट्रेन दाखल झाली. या ट्रेनला विशेष सुरक्षा देण्यात आली.धोनी याआधी रणजी सामन्याच्या वेळी झारखंडच्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी नागपुरात उपस्थित होता. झारखंडमध्ये सामना असताना संघाच्या बसमधून जाण्याऐवजी धोनीने आपल्या आलिशान कारमधून प्रवास करणे पसंत केल्याचे आपण याआधीही पाहिले आहे. पण यावेळी झारखंडचे युवा खेळाडू ट्रेनने प्रवास करणार असल्याने धोनीनेही आपली स्वत:ची कार टाळून सहकाऱ्यांसोबत ट्रेननेच प्रवास केला. कोलकाताच्या ईडन गार्डनवर विजय हजारे करंडक स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. येत्या २५ तारखेपासून स्पर्धेला सुरुवात होणार असून झारखंडला कर्नाटकविरुद्ध पहिला सामना त्याच दिवशी खेळायचा आहे.(वृत्तसंस्था)
धोनी १३ वर्षांनंतर ट्रेनमध्ये
By admin | Updated: February 23, 2017 01:10 IST