मुंबई : इंडियन प्रिमीयर लीग टी-२० स्पर्धेच्या आठव्या पर्वात सलग तिसरा विजय मिळविल्यामुळे मुंबई इंडियन्स संघाचे मनोधैर्य उंचावले आहे. मुंबई इंडियन्सला मंगळवारी वानखेडे स्टेडियममध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. मोहालीमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध २३ धावांनी सरशी साधून विजयाची हॅट््ट्रिक नोंदवणारा मुंबई इंडियन्स संघ डेअरडेव्हिल्सविरुद्धच्या लढतीपूर्वी चांगल्या फॉर्मात आहे. दुसऱ्या बाजूचा विचार करता, डेअरडेव्हिल्स संघाला कामगिरीत सातत्य राखता आलेले नाही. रविवारी रात्री डेअरडेव्हिल्स संघाला राजस्थान रॉयल्सविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. मुंबई व दिल्ली संघांनी प्रत्येकी ९ सामने खेळून प्रत्येकी ८ गुणांची कमाई केली आहे; पण सरस नेटरनरेटच्या आधारावर दिल्ली संघ गुणतालिकेत मुंबई संघाच्या तुलनेत वरच्या स्थानी आहे. डेअरडेव्हिल्स सहाव्या, तर मुंबई सातव्या स्थानी आहे. सलामीवीर पार्थिव पटेलला गवसलेला सूर मुंबई संघासाठी आनंदाची बाब आहे. पार्थिवने रविवारी यंदाच्या मोसमातील पहिले अर्धशतक झळकावताना त्याचा सलामीचा सहकारी लेंडल सिमन्ससोबत पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. दुखापतीमुळे काही खेळाडूंना गमावल्यानंतर मुंबई इंडियन्स संघव्यवस्थापन संघाचा योग्य ताळमेळ साधण्यात यशस्वी ठरले आहे. रविवारी दिल्ली संघाला लौकिकाला साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले. दिल्ली संघाचे क्षेत्ररक्षण सुमार दर्जाचे होते. युवराजसिंगचा खराब फॉर्म संघासाठी चिंतेचा विषय आहे. मुंबई संघाला सूर गवसला असला, तरी यानंतरचा एक पराभव त्यांच्या प्लेआॅफसाठी पात्रता मिळविण्याच्या मोहिमेत अडथळा ठरणार आहे. मुंबईची मधली फळी दमदार असून, चांगल्या सलामीचा लाभ घेण्यास सक्षम आहे. श्रीलंकेचा लसिथ मलिंगा व न्यूझीलंडचा मिशेल मॅक्लेनाघन यांच्या समावेशामुळे मुंबईची गोलंदाजीची बाजू मजबूत आहे. याव्यतिरिक्त हरभजनसिंगसारखा अनुभवी गोलंदाज फिरकीची बाजू सांभाळण्यास सक्षम आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सचा विजयरथ रोखणे दिल्ली संघासाठी आव्हान ठरणार आहे. (क्रीडा प्रतिनिधी)
मुंबई इंडियन्सपुढे दिल्लीचे आव्हान
By admin | Updated: May 5, 2015 00:53 IST