बंगळुरू : विश्वकप फुटबॉल पात्रता फेरीमध्ये ओमानविरुद्ध झालेल्या १-२ पराभवानंतर भारताचे प्रशिक्षक स्टिफन कंस्टेनटीन यांनी पंचांच्या अजब निर्णयाबाबत आश्चर्य व्यक्त केले. गुरुवारी बंगळुरू येथे झालेल्या या सामन्यात भारताला बलाढ्य ओमानविरुद्ध निसटता पराभव पत्करावा लागला होता.मध्यंतराला १-२ अशा पिछाडीवर असताना भारताने ६९व्या मिनिटाला सामन्यात बरोबरी केल्याचे वाटले. मात्र, पंचांनी रॉबिन सिंगला आॅफ साइड असल्याचा निर्णय दिल्याने भारताची पिछाडी कामय राहिली. हा सामन्यातील निर्णायक क्षण राहिला. सी. के. विनीतने उजव्या बाजूने आक्रमक चाल करताना ओमानच्या गोलजाळ्याच्या दिशेने कीक मारली. या वेळी बचावपटू सल्लाम अमुरने आपल्याच गोलजाळ्यात चेंडू ढकलला. मात्र, लाइनमॅननुसार रॉबिन याआधीच आॅफ साइड स्थितीमध्ये आला होता. या नाकरण्यात आलेल्या गोलबाबत कंस्टेनटीन यांनी सांगितले, की गोल का नाकारण्यात आला हे मला माहीत नाही. हा वैध गोल होता आणि ज्या वेळी कॉर्नरवरील लाइन्समॅनने झेंडा उंचावला त्या वेळी तर मला धक्काच बसला. अजूनही काही निर्णय होते, ज्याबाबतीत पंचाला विचारण्याची गरज आहे. असे असले तरी, मी पंचांना दोषी ठरवणार नाही. आम्ही सामन्यात अतिरिक्त प्रयत्न केले नाहीत, असेही कंस्टेनटीन यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)
पंचांचे निर्णय आश्चर्यकारक होते
By admin | Updated: June 13, 2015 00:50 IST