नवी मुंबई : महापालिकेच्या वतीने महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद पुणे यांच्या मान्यतेने व ठाणे जिल्हा तालीम संघाच्या सहकार्याने कोपरखैरणे येथील रा.फ.नाईक विद्यालयाच्या मैदानावर घेण्यात आलेल्या नवी मुंबई महापौर चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेची रविवारी सांगता झाली. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या सामन्यात सोलापूरचा दत्ता नरळे महापौर केसरीचा मानकरी ठरला, तर महापौर कुमार केसरी स्पर्धेत कोल्हापूरच्या विजय पाटील यांनी जेतेपद पटकाविले.दोन दिवशीय या स्पर्धेत राज्यस्तरीय पुरुषांचे तीन व महिलांचे दोन वजनी गट त्याचप्रमाणे नवी मुंबई महापालिका क्षेत्र स्तरावर पुरुषांचे चार वजनी गट अशा नऊ वजनी गटांमध्ये या स्पर्धा खेळविण्यात आल्या. प्रत्येक गटातील पहिल्या तीन क्र मांकांना स्मृतिचिन्हे व रोख पारितोषिके प्रशस्तिपत्रासह देऊन सन्मानित करण्यात आले. चौथ्या क्र मांकासही प्रशस्तिपत्रासह रोख पारितोषिक प्रदान करण्यात आले. चार लाखापेक्षा अधिक रकमेची पारितोषिके प्रदान करण्यात आली. अंतिम सामना सोलापूरचा दत्ता नरळे आणि अहमदनगरचा संतोष गायकवाड यांच्यात झाला. अत्यंत चुरशीच्या या लढतीत नरळे यांनी संतोष यांच्यावर मात करीत महापौर केसरी चषकावर आपले नाव कोरले.प्रथम विजेता ठरलेल्या दत्ता नरळे याचा एक लाख रुपये रोख, चांदीची गदा व मानाचा पट्टा देवून महापौर जयवंत सुतार यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. महापौर कुमार केसरी स्पर्धेत कोल्हापूरच्या विजय पाटील याने पुण्याच्या निखील कदम याच्यावर मात करीत विजयश्री खेचून आणली. नवी मुंबईचा वैभव रासकर तृतीय आणि सोलापूरचा सुनील खताळ हे पैलवान चतुर्थ क्र मांकाचे मानकरी ठरले.यावेळी व्यासपीठावर महापौर जयवंत सुतार यांच्यासह आमदार संदीप नाईक, क्र ीडा व सांस्कृतिक समितीचे सभापती मुनावर पटेल, नगरसेवक लीलाधर नाईक, गणेश म्हात्रे, क्र ीडा अधिकारी रेवप्पा गुरव, नवी मुंबई कुस्तीगीर संघटनेचे सचिव कृष्णा रासकर, माजी सैनिक नरेंद्र पाटील आदी उपस्थित होते.
दत्ता नरळे नवी मुंबई महापौर केसरी, कोल्हापूरचा विजय पाटील कुमार केसरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2019 23:19 IST