नवी दिल्ली : लेगस्पिनर अमित मिश्राची जादुई फिरकी गोलंदाजी आणि त्यानंतर क्विंटन डिकॉक याने दोन जीवदानाचा लाभ घेताना फटकावलेले अर्धशतक या बळावर दिल्ली डेअरडेव्हिल्सने आपल्या घरच्या मैदानावर किंग्ज इलेव्हन पंजाबचा ३९ चेंडू आणि ८ विकेट राखून पराभव करताना आयपीएलच्या नवव्या पर्वात विजयाचे खाते उघडले.पंजाबला १११ धावांत रोखल्यानंतर डिकॉक (४२ चेंडूंत नाबाद ५९) आणि संजू सॅमसन (३३) यांनी दुसऱ्या गड्यासाठी ९१ धावांची भागीदारी करीत दिल्ली डेअरडेव्हिल्सला सहज विजय मिळवून दिला. दिल्लीने विजयी लक्ष्य १३.३ षटकांत २ गडी गमावून ११३ धावा करीत पूर्ण केले. डिकॉकने त्याच्या खेळीत ९ चौकार व एक षटकार मारला तर सॅमसनने ३२ चेंडूंत ३चौकार व एक षटकार ठोकला.या स्पर्धेत डेअरडेव्हिल्सचा पहिला विजय ठरला तर किंग्ज इलेव्हनला सलग दुसऱ्यांदा पराभवाची चव चाखावी लागली. विजयाचा पाठलाग करताना दिल्लीने श्रेयस अय्यर (३) याच्या रुपाने पहिला फलंदाज गमावला. त्यानंतर डिकॉकही बाद झाला असता; परंतु मुरली विजयने त्याचा डिप स्कवेअरलेगला झेल सोडला. डिकॉकला रिद्धिमान साहानेदेखील यष्टिचीत करण्याची संधी हुकवली. या दोन जीवदानाचा डिकॉकने पुरेपूर लाभ उठवताना दिल्लीला विजय मिळवून दिला.त्याआधी अमित मिश्राने त्याच्या आयपीएलमधील १00 वा सामना संस्मरणीय ठरवताना आपल्या जादुई फिरकी गोलंदाजीचा नजारा सादर केला. त्याच्या या कामगिरीच्या बळावर दिल्ली डेअरडेव्हिल्सने किंग्ज इलेव्हन पंजाबला ९ बाद १११ धावांवर रोखले.मिश्राने तीन षटकांत ११ धावांत ४ गडी बाद करताना या टी-२0 लीगमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा फिरकी गोलंदाज बनला. कर्णधार जहीर खान आणि ख्रिस मॉरीस यांनी किफायती गोलंदाजी करताना त्यांच्या ४ षटकांत अनुक्रमे १४ व १९ धावा दिल्या व प्रत्येकी १ गडी बाद केला. किंग्ज इलेव्हनचे फक्त पाच फलंदाज दुहेरी आकडी धावसंख्या गाठू शकले. त्यात मनन व्होराने सर्वाधिक ३२ धावा केल्या.जहीरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि त्याने त्याच्या पहिल्या तीन षटकांत फक्त ८ धावा दिल्या. त्याने आपली लाईन, लेंग्थ आणि मुव्हमेंटने मनन व्होराला परेशान केले. त्यामुळे किंग्ज इलेव्हन पंजाब अपेक्षित सुरुवात करण्यात अपयशी ठरले. त्यांनी मुरली विजयलादेखील प्रारंभीच गमावले. विजयने आयपीएलमध्ये सर्वाधिक १२ वेळेस धावबाद होण्याचा विक्रमदेखील केला.जहीरने कव्हरमध्ये व्होराचा सोपा झेल सोडला; परंतु तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात विजय धावबाद झाला. आयपीएलमध्ये धावबाद होण्याबाबत त्याने गौतम गंभीर आणि वेणुगोपाल राव यांना मागे टाकले. (वृत्तसंस्था)संक्षिप्त धावफलक : पंजाब : २0 षटकात ९ बाद १११. (मनन व्होरा ३२, पी. साहू १८, मोहित शर्मा १५, अमित मिश्रा ४/११, झहीर खान १/१४).दिल्ली डेअरडेव्हिल्स : १३.३ षटकात २ बाद ११३. (क्विंटन डीकॉक नाबाद ५९, संजू सॅमसन ३३)
डेअरडेव्हिल्सने उघडले विजयाचे खाते
By admin | Updated: April 16, 2016 04:45 IST