रवी शास्त्री लिहितात...सोमवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या लढतीत टी. नटराजन मैदानावर न उतरण्याची शक्यता आहे. पण, आता तो अनोळखी चेहरा राहिलेला नाही. विशेषत: आयपीएलच्या लिलावामध्ये बिगरमानांकित खेळाडूंमध्ये त्याला सर्वाधिक रकमेत करारबद्ध करण्यात आले होते. पुणे सुपरजायंटविरुद्धच्या लढतीत त्याच्या तीन षटकांच्या स्पेलकडे डोळेझाक करता येणार नाही. त्यात त्याने अजिंक्य रहाणेला बाद केले होते. पण, इंदूरची खेळपट्टी बघितल्यानंतर किंग्स इलेव्हन पंजाब संघाला गोलंदाजी विभागात आणखी एका फिरकीपटूची गरज भासेल. नटराजनची कथा चकित करणारी आहे. पाच वर्षांपूर्वी त्याने लेदर चेंडू विशेष बघितला नव्हता, पण कामगाराचा मुलगा असलेला नटराजन टेनिस बॉलने अचूक यॉर्कर टाकण्यात माहीर होता आणि त्याने स्टीव्ह स्मिथविरुद्ध याचाच वापर केला. पंजाबने पुणेविरुद्ध दोन फिरकीपटू अक्षर पटेल व स्वप्निल सिंग यांना संधी दिली. आरसीबीविरुद्ध त्यांना अतिरिक्त फिरकीपटूची गरज भासली तर त्यांच्याकडे राहुल तेवितया आणि केसी करियप्पा यांच्यापैकी एकाची निवड करण्याचा पर्याय शिल्लक आहे. पंजाब संघाच्या गोलंदाजांमध्ये जास्तीत जास्त भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. एका दशकापूर्वी डावखुरा फिरकीपटू स्वप्निल सिंगने बडोद्यातर्फे प्रथम श्रेणी कारकिर्दीची सुरुवात वयाच्या १४ व्या वर्षी केली होती, याचा उल्लेख करणे आवश्यक आहे. आरसीबीबाबत चर्चा करताना युजवेंद्र चहल, इक्बाल अब्दुल्ला आणि पवन नेगीच्या समावेशामुळे त्यांची फिरकीची बाजू मजबूत आहे. गेल व वॉटसन धावांचा पाऊस पाडण्यात यशस्वी ठरले तर बंगळुरू संघ कोहलीविनाही आगेकूच करू शकतो. पंजाबच्या फिरकीपटूंविरुद्ध गेलच्या कामगिरीबाबत उत्सुकता आहे. उभय संघांमध्ये आॅस्ट्रेलियन खेळाडूंचा चांगला भरणा आहे. आॅस्ट्रेलियन खेळाडू आक्रमक असतात. सोमवारी खेळल्या जाणाऱ्या लढतीच्या निमित्ताने चुरस अनुभवाला मिळण्याची शक्यता आहे. (टीसीएम)
पंजाबचे फिरकीपटू आणि गेल यांच्यातील लढतीबाबत उत्सुकता
By admin | Updated: April 10, 2017 01:21 IST