क्रिकेट विंडीज
By admin | Updated: February 16, 2015 21:11 IST
आयर्लंडचा विंडीजला धक्का
क्रिकेट विंडीज
आयर्लंडचा विंडीजला धक्कापॉल स्टर्लिंग, एड जॉयस, नील ओब्रायनची अर्धशतकेनेल्सन : पॉल स्टर्लिंग (९२), एड जॉयस (८४) व नील ओब्रायन (७९) यांच्या वैयक्तिक अर्धशतकी खेळीच्या जोरावर जायंट किलर आयर्लंडने सोमवारी खेळल्या गेलेल्या लढतीत वेस्ट इंडीजचा ४ गडी राखून पराभव केला आणि आयसीसी विश्वकप स्पर्धेत धक्कादायक निकालाची नोंद केली. गेल्या दोन विश्वकप स्पर्धेत पाकिस्तान व इंग्लंड यांच्यासारख्या अव्वल संघांना पराभवाचा तडाखा देणाऱ्या आयर्लंडने यावेळीही धक्कादायक निकाल नोंदविण्याची परंपरा कायम राखली. वेस्ट इंडीजने दिलेले ३०५ धावांचे लक्ष्य आयर्लंडने ४५.५ षटकांत ६ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. विंडीजतर्फे वेगवान गोलंदाज जेरोम टेलरने ७१ धावांच्या मोबदल्यात ३ बळी घेतले. त्याआधी, वेस्ट इंडीजने निराशाजनक सुरुवातीनंतर लेंडल सिमन्स (१०२) व डॅरेन सॅमी (८९) यांच्या आक्रमक खेळीच्या जोरावर ७ बाद ३०४ धावांची मजल मारली. सिमन्स व सॅमी यांनी सहाव्या विकेटसाठी १५४ धावांची भागीदारी केली. विश्वकप स्पर्धेत सहाव्या विकेटसाठी ही तिसरी सर्वोत्तम भागीदारी ठरली. विंडीजचे क्षेत्ररक्षण सुमार दर्जाचे होते. त्यांच्या क्षेत्ररक्षकांनी किमान चार झेल सोडले. अर्धशतकी खेळी करणाऱ्या जॉयसला वैयक्तिक ४२ धावांवर असताना जेसन होल्डरच्या गोलंदाजीवर डॅरेन ब्राव्होने जीवदान दिले तर नील ओब्रायनला २८ व ३८ धावांवर जीवदान मिळाले. सलामीवीर विलियम पोर्टरफिल्डचा (२३) स्वत:च्या चेंडूवर उडालेला झेल आंद्रे रसेलला टिपण्यात अपयश आले. आयर्लंडला अखेरच्या १० षटकांत विजयासाठी २२ धावांची गरज होती. त्यानंतर ॲण्डी बिलबिर्नी (०९), गॅरी विल्सन (०१) आणि केव्हिन ओब्रायन (००) एकापाठोपाठ बाद झाले. नील ओब्रायनने संघाला विजयी लक्ष्य गाठून दिले. नील ओब्रायनने ६० चेंडूंच्या खेळीमध्ये ११ चौकार ठोकले. त्याआधी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारणाऱ्या वेस्ट इंडीजची एकवेळ ५ बाद ८७ अशी अवस्था झाली होती, पण त्यानंतर सिमन्स व सॅमी यांनी डाव सावरला. ड्वेन स्मिथ (१८), ब्राव्हो (०), ख्रिस गेल (३६ धावा, ६५ चेंडू, ३ चौकार, १ षटकार) यांना मोठी खेळी करता आली नाही. दिनेश रामदिन (१) यालाही छाप सोडता आली नाही.