- अयाझ मेमन पहिल्या कसोटीत भारतानं ३३३ धावांनी मात खाल्ली, अडीच दिवसांतच ही कसोटी आॅस्ट्रेलियानं जिंकली. यावरून आपल्या लक्षात येतं की, पाहुणे किती तयारी करून आले आहेत आणि आपण किती वाईट खेळलो. आता प्रश्न असा आहे की, या पराभवानंतर येथून पुढे भारत या मालिकेमध्ये पुनरागमन करणार का? आणि कशा पध्दतीने करणार? कोण या मालिकेत भारताला बरोबरीत आणू शकणार? माझ्यामते ही जबाबदारी पडते ती कर्णधार विराट कोहली आणि रविचंद्रन आश्विन यांच्यावर. हा सांघिक खेळ असला तरी सर्वात जास्त जबाबदारी त्यांनाच घ्यावी लागेल. आपल्या कामगिरीने स्टार बनलेले खेळाडू हे प्रतिस्पर्ध्यांच्या टार्गेटवर असतात. विराट कोहलीने पहिल्या कसोटीत जास्त धावा केल्या नाहीत. पहिल्या डावात त्याने एका बाहेर जाणाऱ्या चेंडूला छेडले. दुसऱ्या डावात त्याने सोडून दिलेला चेंडू स्टम्पवर आदळला. विराट असे सहसा बाद होत नाही, कारण चेंडूची लाईन आणि लेंग्थ ओळखण्याची त्याची क्षमता इतरांपेक्षा जास्त आहे. हा चेंडू ओळखण्यात तो चुकला असेच म्हणावे लागेल.यापुढे विराट कोहलीला लगाम घालण्याची रणनीती आॅस्ट्रेलियन संघ आखण्याची शकयता आहे. कारण विराट कोहली दबावात आला तर संपूर्ण बॅटिंग आॅर्डर, एका अर्थाने पूर्ण संघच दबावात येतो. याचा अर्थ असा नाही की, दुसरे खेळाडू खेळ करीत नाही. चेतेश्वर पुजारा, मुरली विजय यांनी चांगल्या हंगामात चांगल्या धावा केल्या आहेत. के. एल. राहुलच्या कामगिरीत सातत्य नसले तरी तो उपयुक्त फलंदाज आहे. पुणे कसोटीत अर्धशतक करणारा तो एकमेव भारतीय आहे. बंगळुरूमधील कसोटीत विराट आणि आश्विन यांना पुढे येऊन जबाबदारी घ्यावी लागेल, नुसती घ्यावी लागणार नाही तर स्वत:च्या कामगिरीने सहकऱ्यांना प्रेरित करावे लागेल. सामन्याच्या पहिल्या मिनिटापासूनच त्यांना आॅस्ट्रेलियावर वर्चस्व गाजवावे लागेल. दुसऱ्या कसोटीत आॅस्ट्रेलियाच्या टार्गेटवर विराट आणि अश्विन हे दोघे अग्रक्रमाने असतील एवढे मात्र निश्चित.(लेखक लोकमतचे संपादकीय सल्लागार आहेत)
प्रतिस्पर्ध्यांचे टार्गेट विराट-आश्विन
By admin | Updated: March 1, 2017 00:05 IST