वेटलिफ्टर्सनी राष्ट्रकुल स्पर्धेत धडाकेबाज कामगिरी केल्यानंतर आता नेमबाजही त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवताना दिसत आहेत. भारताच्या मेहुली घोषने १० मीटर एअर रायफल प्रकारात रौप्यपदकाची कमाई केली आहे. तर याच प्रकारात भारताच्या अपूर्वा चंडेलाने कांस्यपदक पटकावले आहे. मेहुली घोषने सिंगापूरच्या मार्टिना लिंडसे वेलोसोला कडवी टक्कर दिली होती. मात्र तिचे सुवर्णपदक थोडक्यात हुकले. मेहुली घोषने शेवटच्या शॉटपर्यंत संघर्ष केला. मेहुलीने शेवटच्या शॉटमध्ये १०.९ गुण पटकावल्याने सामना शूटआऊटमध्ये गेला. शूटआऊटमध्ये मेहुलीने ९.९ गुण मिळवले. तर मार्टिनाने १०.३ गुणांची कमाई केली. त्यामुळे मेहुलीला सुवर्णपदकाने हुलकावणी दिली. मात्र तिने सुवर्णपदकासाठी अंतिम क्षणापर्यंत दिलेली झुंज अतिशय कौतुकास्पद होती. मेहुली घोष रौप्यपदक विजेती कामगिरी करत असताना अपूर्वी चंडेलाने कांस्यपदकावर नाव कोरले. अपूर्वीने एकूण २२५.३ गुणांची कमाई केली. अपूर्वीने पात्रता फेरीत ४३२.२ गुण मिळवले होते. या गुणांसह अपूर्वीने राष्ट्रकुल स्पर्धेत नव्या विक्रमाची नोंद केली. याआधी ४१५.६ गुण ही अपूर्वीची राष्ट्रकुल स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरी होती. तिने २०१४ मध्ये ग्लास्गोत झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत ही कामगिरी केली होती.
Commonwealth Games 2018: नेमबाजांचा लक्ष्यवेध; मेहुली घोषला रौप्य, अपूर्वी चंडेलाला कांस्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2018 10:39 IST