रांची : येथे 2012 ला आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी क्रीडा उपकरणांच्या खरेदीत झालेल्या घोटाळ्याप्रकरणी झारखंड दक्षता आयोगाने सोमवारी भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे माजी अध्यक्ष सुरेश कलमाडी यांची साक्षीदार म्हणून चौकशी केली.
कलमाडी यांना एक प्रश्नावली देण्यात आली होती. त्याचे लेखी उत्तर त्यांनी सादर केले. कलमाडी जवळपास सव्वा दोन तास येथे होते. या दरम्यान लेखी उत्तरात काही लोकांची नावे लिहिल्यामुळे त्यांना पुन्हा चौकशीसाठी बोलविले जाण्याची शक्यता आहे.
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन झाले तेव्हा कलमाडी आयओएचे प्रमुख होते. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी क्रीडा उपकरणो खरेदीत जो घोटाळा झाला त्याप्रकरणी पथकाने 14 ऑक्टोबर रोजी आयोजन समितीचे प्रमुख एस. एम. हाशमी आणि माजी क्रीडा संचालक पी. सी. मिश्र यांना अटक केली होती.(वृत्तसंस्था)