कराची : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाकिस्तान दौऱ्यानंतर लवकरच शुभवार्ता मिळण्याची शक्यता वर्तवताना पीसीबीचे अध्यक्ष शहरयार खान यांनी भारत-पाक द्विपक्षीय क्रिकेट मालिकेची आशा व्यक्त केली आहे. दरम्यान, मालिकेबाबत अद्याप आशावादी असल्यामुळे शहरयार यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. गेल्या काही महिन्यांपासून भारताविरुद्धच्या मालिकेसाठी सातत्याने प्रयत्नशील असलेल्या शहरयार यांना भारताकडून अद्याप सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानंतर मालिकेबाबत वातावरण निर्माण होईल आणि लवकरच चांगले वृत्त मिळेल, असे शहरयार खान यांनी प्रसारमाध्यमांसोबत बोलताना सांगितले. शहरयार यांच्या वक्तव्यावर सर्वत्र टीका होत आहे. पीसीबीचे माजी अध्यक्ष एजाज बट म्हणाले, ‘ते जुनाच राग का आळवत आहेत, हे मला अद्याप कळलेले नाही. भारत सध्या आमच्यासोबत खेळण्यास इच्छुक नाही, हे स्पष्ट झालेले आहे. आम्ही भारतासोबत खेळण्यासाठी एवढे उत्सुक का आहोत, हे समजण्यापलीकडे आहे.’बट पुढे म्हणाले, ‘भारतासोबत द्विपक्षीय क्रिकेट प्रारंभ करण्यासाठी शहरयार यांच्या प्रयत्नांची प्रशंसा करतो, पण टाळी दोन्ही हाताने वाजते, हे लक्षात असायला हवे.’ माजी कर्णधार आमिर सोहेल म्हणाला, ‘भारताविरुद्ध न खेळताही आठ वर्षांपासून पाकिस्तान क्रिकेट सुरू आहे. आताही भारत खेळत नसेल, तर विशेष फरक पडणार नाही.
शहरयार यांच्यावर टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2015 03:29 IST