शिवाजी गोरे, पुणेसुरुवातीपासून अत्यंत चुरशीने खेळल्या गेलेल्या आजच्या अखेरच्या १३व्या फेरीत चीनचा ग्रँडमास्टर लू शांगले याने सर्बियाचा ग्रँडमास्टर इंडिक अलेक्झांडरवर नेत्रोद्दीपक विजय नोंदवून जागतिक ज्युनिअर बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद जिंकले. जगातील ४ अव्वल बुद्धिबळपटू १२व्या फेरीत ९ गुणांसह संयुक्त आघाडीवर होते. त्यामुळे अंतिम फेरीत कोण बाजी मारेल, याकडे सर्व जगाचे लक्ष लागले होते. चीनच्या लूने ३१व्या चालीत इंडिकला नमवून एका गुणाची कमाई करीत ज्युनिअर विश्व चषकावर आपले नाव कोरले. अखेरची फेरी सुरू होण्यापूर्वी पहिल्या पटावर खेळत असलेल्या यो वेईला विजेतेपद मिळविण्याची सर्वांत अधिक संधी होती, तर त्याच्या खालोखाल दुसऱ्या पटावर खेळणाऱ्या फेडोसोव्हला त्याच्या नंतरची संधी होती. वेगळी पद्धत वापरून आणि जिंकण्यासाठी कमालीचा धोका पत्करून यो वेईने डाव जिंकण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. मात्र, त्याची झुंज त्याला विजयापर्यंत नेऊ शकली नाही आणि त्याला बरोबरीवर समाधान मानावे लागले. अग्रमानांकित फेडोसोव्हला काळ्या मोहऱ्या घेऊन खेळण्याचा तोटा होता आणि तो सुरुवातीपासूनच चाचपडत होता. एकदा त्याची परिस्थिती अशी होती की विजय मिळविणे दूरच पण डाव वाचला तरी चांगले. आपल्या अनुभवाच्या जोरावर फेडोसोव्हने पराभव टाळला खरा; पण बरोबरी साधून त्याने स्पर्धेचे अजिंक्यपद मिळविण्याची संधी नक्कीच दवडली. या दोन्ही निकालांनी विचलित न होता, लूने प्रारंभापासून आपले आक्रमक धोरण कायम ठेवले होते. अलेक्झांडरला पूर्णपणे निष्प्रभ करीत त्याने बाजी मारली.
चीनचा लू याला जेतेपद
By admin | Updated: October 20, 2014 04:30 IST