ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 24 - चीनचा प्रतिस्पर्धी बॉक्सर जुल्फिकार मेमेतियाली याने कुठलेली कारण न देता भारताचा स्टार बॉक्सर विजेंदरसिंग याच्याविरुद्ध लढण्यास चक्क नकार दिला आहे.
१ एप्रिल रोजी मुंबईत उभयतांमध्ये सुपर मिडलवेटची दुहेरी आशियाई जेतेपदाची लढत होणार होती. ही लढत पूर्वनिर्धारित कार्यक्रमानुसारच होईल पण विजेंदरविरुद्ध जुल्फिकारऐवजी दुसरा बॉक्सर उभा असेल. विजेंदरकडे डब्ल्यूबीओ आशिया पॅसिफिकचे जेतेपद असून चीनच्या जुल्फिकारकडे डब्ल्यूबीओ ओरिएंटलचे जेतेपद आहे. विजेंदरच्या प्रमोटर्सने दिलेल्या माहितीनुसार जुल्फिकारने माघार घेण्यामागील कारण दिलेले नाही. विजेंदरविरुद्ध मी वर्षाअखेरीस खेळणे पसंत करेन, इतकेच त्याने सांगितले.
विजेंदर मात्र १ एप्रिल रोजी रिंगणार उतरणार आहे. त्याच्याविरुद्ध खेळण्यासाठी प्रमोटर्स अन्य आंतरराष्टÑीय बॉक्सरचा शोध घेत आहेत. या घटनाक्रमाविषयी विजेंदर म्हणाला,‘मी कुठलीही गोष्ट सकारात्मकपणे घेतो. जुल्फिकारच्या माघारीमागे काही कारणे असतील. माझ्याविरुद्ध पुढचा जो प्रतिस्पर्धी राहील त्याच्याविरुद्ध मी सज्ज आहे. माझे प्रमोटर्स नवे आव्हान सादर करतील, असा विश्वास आहे.’