चेन्नई : आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ चेन्नई सुपर किंग्ज मैदानाबाहेरील वादांना तिलांजली देताना उद्या दिल्ली डेअर डेविल्सविरुद्ध आयपीएलच्या आठव्या पर्वातील त्यांच्या सलामीच्या लढतीत विजय मिळवण्याच्या इराद्याने गुरुवारी मैदानात उतरेल.चेन्नई सुपर किंग्जचा संघ स्पॉट फिक्सिंग आरोपाच्या भोवऱ्यात अडकला होता. या संघाचे टीम प्रिन्सिपल गुरुनाथ मयप्पन यांना गेल्या वर्षी न्यायालयाद्वारे स्थापित समितीने दोषी ठरवले होते.गतवर्षी उपांत्य फेरी गाठणाऱ्या चेन्नईने या स्पर्धेत चार वेळेस अंतिम फेरी गाठली आहे आणि दोनदा विजेतेपदाचीही चव चाखली आहे. यंदाही महेंद्रसिंह धोनीचे जादुई नेतृत्व आणि प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंगच्या मार्गदर्शनाखाली हा संघ पुन्हा यशाचे शिखर गाठण्यास आतुर असेल. त्याचप्रमाणे विजेतेपद पटकावून आपल्या टीकाकारांचे तोंड बंद करण्याचाही त्यांचा निर्धार असेल. या संघातील प्रमुख खेळाडू जवळपास पूर्वीचेच आहेत; परंतु संघाने यंदा इरफान पठाण, मायकल हसी, कोएल एबोट आणि राहुल शर्मालादेखील खरेदी केले आहे.वर्ल्डकपमध्ये शानदार फॉर्ममध्ये असणारा न्यूझीलंडचा कर्णधार ब्रँडन मॅक्युलम आणि ड्वेन स्मिथ यांच्यावर डावाची सुरुवात करण्याची जबाबदारी असेल. मधल्या फळीत सुरेश रैना, हसी, धोनी, ड्वेन ब्राव्हो, तर तळातील क्रमात रवींद्र जडेजा आणि आर. आश्विनसारखे अष्टपैलू खेळाडू आहेत. गोलंदाजीत चेन्नईकडे जडेजा आणि आश्विनसारखे फिरकी गोलंदाज आहेत, तर वेगवान गोलंदाजीची मदार ही काईल एबोट, मॅट हेन्री आणि मोहित शर्मा यांच्यावर असेल. दुसरीकडे गत वेळेस गुणतालिकेत तळाला असणारा दिल्ली डेअर डेव्हिल्सचा जवळपास पूर्ण नवीन संघ आहे. त्यांनी भारतीय संघातून ‘आऊट’ झालेल्या युवराजसिंगला विक्रमी १६ कोटी रुपयांना खरेदी केले आहे. गेल्या दोन पर्वात दुबळा संघ ठरणाऱ्या दिल्ली संघाच्या आशा यंदा युवराजवर असतील. युवराजशिवाय त्यांनी भारतीय संघात पुनरागमन करण्यास उत्सुक असणाऱ्या ३६ वर्षीय वेगवान गोलंदाज जहीर खानलाही खरेदी केले आहे. जेपी ड्युमिनीच्या नेतृत्वाखालील संघाकडे डावाची सुरुवात करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा यष्टिरक्षक फलंदाज क्विंटोन डिकॉक आणि मयंक अग्रवाल आहेत. त्यानंतर ड्युमिनी, युवराज, केदार जाधव व अॅल्बी मॉर्कल असतील. गोलंदाजीत दक्षिण आफ्रिकेचा लेगस्पिनर इम्रान ताहीर वर्ल्डकपमधील शानदार कामगिरी कायम राखू इच्छील. त्याला साथ मिळणार आहे ती जहीर आणि मोहंमद शमी यांची. कागदावर हा संघ तुल्यबळ दिसत आहे; परंतु हा संघ मैदानावर कितपत एकसंघ खेळतो हे पाहणे मनोरंजक ठरेल. (वृत्तसंस्था)
वादाला तिलांजली देत खेळणार चेन्नई सुपर किंग्स
By admin | Updated: April 9, 2015 01:14 IST