ऑनलाइन लोकमत,
चेन्नई, दि. २२ - विराट कोहलीच्या दमदार १३८ धावा आणि सुरेश रैनाच्या ५३ धावांच्या खेळीच्या आधारे चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर ३०० धावांचे आव्हान ठेवले आहे. चांगली सुरुवात होऊनही शेवटच्या पाच षटकात तळाच्या फलंदाजांनी अपेक्षीत साथ न दिल्याने भारताला ३०० धावांवरच रोखण्यात आफ्रिकेच्या गोलंदाजांना यश आले आहे.
चेन्नईतील चौथ्या एकदिवसीय सामन्यात महेंद्रसिंह धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर रोहित शर्मा २१ आणि शिखर धवन ७ धावांवर बाद झाल्याने भारताची अवस्था २ बाद ३५ धावा अशी झाली होती. मात्र यानंतर तिस-या क्रमांकावर आलेल्या विराटने अजिंक्य रहाणेच्या साथीने भारताचा डाव सावरला. विराट आणि रहाणे या जोडीने तिस-या विकेटसाठी १०४ धावांची भागीदारी रचली. विराटपाठोपाठ रहाणेही अर्धशतक झळकावेल असे वाटत असताना डेल स्टेनने रहाणेला बाद करत ही जोडी फोडली. रहाणे ४५ धावांवर बाद झाला. या मालिकेत सपशेल अपयशी ठरलेला सुरेश रैना पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. या सामन्यात सुरेश रैनानेही सावध सुरुवात करत विराटला सुरेख साथ दिली. विराट कोहलीने १३८ धावा तर सुरेश रैनाने ५३ धावांची खेळी केली. सुरैश रैना बाद झाला त्यावेळी भारताची स्थिती ४५ षटकांत ४ बाद २६६ अशी होती. मात्र त्यानंतर धोनी (१५ धावा), हरभजन (०) आणि अक्षर पटेल ( नाबाद ४ धावा) या तळाच्या फलंदाजांना फटकेबाजी करता आली नाही व भारताला ५० षटकांत ८ विकेट गमावून २९९ धावाच करता आल्या. दक्षिण आफ्रिकेतर्फे डेल स्टेन आणि कॅगिसो रबाडाने प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. तर ख्रिस मॉरिसने एक विकेट घेतली.
विराट कोहली पाचव्या स्थानावर
सर्वाधिक शतकांच्या यादीत विराट कोहली आता पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. विराट कोहलीचे वन डे कारकिर्दीतील हे २३ वे शतक असून १६५ व्या सामन्यांमध्ये त्याने हा विक्रम रचला आहे.