पनवेल : क्रिकेट, फुटबॉलनंतर भारतात बॅडमिंटनला जास्त प्रसिद्धी मिळत आहे. शासनामार्फतही या खेळाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मेहनत आणि दर्जेदार कामगिरी केल्यास या खेळात नक्कीच करिअर होऊ शकते, असे प्रतिपादन माजी आंतराष्ट्रीय बॅडमिंटनपटू इकबाल मैंदर्गी यांनी पनवेल येथे केले.न्यू बॅडमिंटन असोसिएशन आॅफ पनवेलच्या वतीने आयोजित होणाऱ्या जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या स्पर्धेचे माध्यम प्रायोजन ‘लोकमत’ आहे. पनवेल जिमखाना येथे आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवस स्पर्धेला शनिवारपासून सुरुवात झाली. ‘लायनिंग जेएमएम कप २०१६’ असे या स्पर्धेचे नाव आहे. यंदा स्पर्धेचे चौथे वर्ष आहे. जिल्ह्यातील ३० शाळांचे खेळाडू स्पर्धेत सहभागी झाले असून, वुडन कोर्टवर ही स्पर्धा खेळविली जात आहे. रायगड जिल्ह्यातील लोधीवली, रोहा, अलिबाग, पनवेल, खारघर, कळंबोली, कामोठे आदींसह जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून खेळाडू या स्पर्धेसाठी सहभागी झाले आहेत. ७वी ते १०वीमधील विद्यार्थी स्पर्धकांचा या स्पर्धेमध्ये समावेश असणार आहे. मुली व मुले अशा दोन गटांत ही स्पर्धा खेळविली जाणार आहे. त्यांच्यामध्ये दोन एकेरी व एक दुहेरी स्पर्धा होणार आहे. स्पर्धेत तीनपैकी दोन सामने जिंकणारा संघ जेएमएम २०१६ चषकवर कब्जा करेल. स्पर्धेच्या उदघाटन समारंभाला बॅडमिंटन असोसिएशनचे आॅफ इंडियाचे उपाध्यक्ष प्रदीप गंधे, बॅडमिंटन आॅर्गनायझेशन आॅफ रायगडचे डेविड अल्व्हारिस, अध्यक्ष अरुण भिसे, संजीवनी मालवणकर, आशुतोष भिसे, आनंद लांडे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
दर्जेदार खेळामुळे खेळाडूंना करिअरची संधी
By admin | Updated: July 24, 2016 00:56 IST