नवी दिल्ली : एबी डीव्हीलियर्सच्या नेतृत्वाखालील दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांवर नियंत्रण ठेवता ठेवता भारतीय गोलंदाजांच्या नाकीनऊ आले; परंतु सीनिअर आॅफस्पिनर हरभजनसिंगने हे आव्हान पत्करताना खूप मजा आली आणि वनडेतील कामगिरीबद्दल आपण खूश असल्याचे म्हटले आहे.नुकत्याच झालेल्या वनडे मालिकेत हरभजनसिंगने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चार सामन्यांत सहा गडी बाद केले. त्याने फलंदाजीसाठी पोषक असलेल्या खेळपट्टीवर ५.३० प्रतिषटकाने धावा दिल्या. तो म्हणाला, ‘‘या मालिकेत मला खूप मजा आली. जागतिक दर्जाच्या प्रतिस्पर्ध्यांचा सामना करण्याचा वेगळाच आनंद आहे आणि त्यात एक संघाच्या रूपाने तुम्हाला सर्वस्व पणाला लावावे लागते. मी मालिकेतील माझ्या कामगिरीबद्दल खूप समाधानी आहे.’’पहिल्या दोन कसोटींत खेळता येणार नसल्याने वाईट वाटते का, असे विचारले असता त्याने कर्णधार विराट कोहलीशी चर्चा झाली असून, त्याने आपल्या संघाच्या संयोजनाविषयी सांगितले.तो म्हणाला, ‘‘कर्णधाराने मला सांगितले, की दक्षिण आफ्रिका संघातील आघाडीच्या फळीत तीन उजव्या हाताचे फलंदाज (हाशिम आमला, फाफ डू प्लेसिस आणि एबी डीव्हिलियर्स) आहेत. त्यामुळे डावखुऱ्या फिरकी गोलंदाजाची गरज आहे. त्याने मला परिस्थिती समजावून सांगितली. तथापि, संघात परतण्यासाठी मी कठोर मेहनत घेईन.’’हरभजन लवकरच रणजी करंडक स्पर्धेत खेळणार असून, तेथे तो पंजाब संघाच्या नेतृत्वाची धुरा सांभाळणार आहे. तो म्हणाला, ‘‘मी वनडेत चांगली कामगिरी केली; परंतु कोणत्या एका स्वरूपात खेळेल, याचा विचार केला नाही. प्रत्येक स्वरूपातील क्रिकेट स्पर्धा महत्त्वाची आहे. मी तिन्ही स्वरूपाच्या स्पर्धांत खेळू इच्छितो.’’
आफ्रिकेच्या फलंदाजांना गोलंदाजी करणे आव्हान
By admin | Updated: October 28, 2015 22:21 IST