मेलबोर्न : ज्यो बर्न्स आणि उस्मान ख्वाजा यांची धडाकेबाज शतके, तसेच या दोघांमध्ये झालेल्या मोठ्या भागीदारीच्या बळावर आॅस्ट्रेलियाने दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी वेस्ट इंडिजविरुद्ध शानदार सुरुवात करीत ३ बाद ३४५ धावा उभारल्या.दुखापतीतून सावरलेल्या ख्वाजाने चार डावांत तिसरे शतक साजरे करीत १४४ आणि सलामीवीर बर्न्सने १२८ धावा केल्या. खेळ थांबला त्या वेळी कर्णधार स्टीव्हन स्मिथ ३२ आणि होबार्ट कसोटीत दुहेरी शतक ठोकणारा अॅडम व्होग्स दहा धावांवर नाबाद होता. पायांच्या मांसपेशी ताणल्या गेल्याने ख्वाजा बाहेर होता. त्यातून सावरल्यानंतर पुन्हा शतक ठोकले. गेल्या महिन्यात न्यूझीलंडविरुद्ध त्याने १७४ आणि १२१ धावांचे योगदान दिले होते. ख्वाजा-बर्न्स यांनी दुसऱ्या गड्यासाठी या मैदानावरील तिसरी मोठी भागीदारी करीत २८८ धावा केल्या. ख्वाजाला १४२ धावांवर जीवदान मिळाले. मर्लोन सॅम्युअल्सने जेरोम टेलरच्या चेंडूवर कव्हर्समध्ये त्याचा झेल सोडला. टेलरने दोन धावांनंतर यष्टिरक्षक दिनेश रामदीन याच्याकडे त्याला झेल देण्यास बाध्य केले. बर्न्सने २३० चेंडू टोलवित १६ चौकार व एका षटकारासह शतक ठोकून आपली निवड सार्थ असल्याचे सिद्ध केले. होबार्टच्या पहिल्या कसोटीत एक डाव २१२ धावांनी पराभूत विंडीज संघाला आज पुन्हा एकदा बॅकफूटवर यावे लागले. नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेणाऱ्या विंडीजने डेव्हिड वॉर्नरचा (२३) अडथळा लवकर दूर केला. टेलरचा चेंडू पूल करण्याच्या नादात त्याने सॅम्युअल्सकडे झेल दिला. दुसऱ्या सत्रात विंडीजला एकही गदी बाद करता आला नाही. अखेरच्या सत्रात दोन्ही शतकवीर बाद झाले. त्याआधी पावसाच्या व्यत्ययामुळे सामन्याला एक तास विलंबाने सुरुवात झाली. विंडीजचा लेगस्पिनर देवेंद्र बिशू हा सामन्याआधी सरावादरम्यान जखमी झाल्याने त्याला बाहेर बसावे लागले. (वृत्तसंस्था)
बर्न्स, ख्वाजाची शतके
By admin | Updated: December 27, 2015 02:34 IST