इंचियोन : भारतीय नेमबाजांनी सलग दुस-या दिवशी कामगिरीत सातत्य राखताना पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तूलमध्ये कांस्यपदक पटकाविले, महिलांच्या बॅडमिंटन संघानेही आज कांस्य पदकाची कमाई केली. दीपिका पल्लिकलने १७ व्या आशियाई स्पर्धेत महिला एकेरीत तर पुरुष गटात सौरव घोषालने उपांत्य फेरीत प्रवेश करून स्क्वॅशमध्ये दोन पदके निश्चित केली. शनिवारी भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून देणारा नेमबाज जितू रायने ओंगयोन आंतरराष्ट्रीय शूटिंग रेंजमध्ये १० मीटर एअर पिस्तूलमध्ये भारतीय संघाला कांस्यपदक मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. रायने ५८५ गुणांची नोंद करीत अंतिम फेरीत स्थान मिळविले. समरेश जंग (५८०) आणि प्रकाश नाजप्पा (५७८) यांच्या कामगिरीच्या जोरावर भारताने एकूण १७४३ गुणांसह कांस्यपदकाचा मान मिळविला. चीन व भारताचे समान गुण होते. त्यामुळे बुल्सआयच्या आधारावर निर्णय झाला. त्यात भारतीय संघ पिछाडीवर होता. त्यामुळे भारताला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. दक्षिण कोरियाने १७४४ गुणांसह सुवर्णपदकाचा मान मिळविला. स्क्वॅशमध्ये दीपिकाने महिला एकेरीत पहिले पदक निश्चित केले. या व्यतिरिक्त पुरुष विभागात अव्वल मानांकित सौरव घोषालने उपांत्य फेरीत धडक मारली आहे. सौरवने सलग तिसऱ्या आशियाई स्पर्धेत पदक निश्चित केले आहे. त्याने पाकिस्तानच्या इकबाल नासीरचा ५८ मिनिटांमध्ये ११-६, ९-११, ११-२, ११-९ ने पराभव केला. दीपिकाने मायदेशातील सहकारी ज्योत्स्ना चिनप्पाची झुंज ७-११, ११-९, ११-८, १५-१७, ११-९ ने मोडून काढली. हॉकीमध्ये भारतीय पुरुष संघाने ‘ब’ गटाच्या लढतीत श्रीलंकेचा ८-० ने धुव्वा उडवत शानदार सुरुवात केली. पुरुष विभागात टेनिसपटूंनी चमकदार कामगिरी करताना नेपाळचा ३-० ने पराभव करीत उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. युकी भांबरीने जितेंद्र परियारचा ६-०, ६-० ने, तर समन सिंगने अभिषेक बास्तोलाचा ६-०, ६-१ ने पराभव केला. दिविज शरण व साकेत मयनेनी यांनी दुहेरीमध्ये संतोष खत्री व सोनम दवा यांचा ६-०, ६-० ने फडशा पाडला. नेमबाजीमध्ये भारताच्या ट्रॅप नेमबाजांची कामगिरी निराशाजनक ठरली. मनशेरसिंग, मानवजितसिंग संधू व दारियस किनान चेनाई यांच्यापैकी एकाही नेमबाजाला अव्वल १० मध्ये स्थान मिळविता आले नाही. मनशेर, संधू व चेनाई यांना अनुक्रमे ११, १४ व ३६ व्या स्थानावर समाधान मानावे लागले. जितू रायला १० मीटर एअर पिस्तूलमध्ये वैयक्तिक गटात पदक पटकाविण्यात अपयश आले. त्याला पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले. जलतरणपटूंची कामगिरी निराशाजनक ठरली. सौरव सांगवेकरला पुरुषांच्या २०० मीटर फ्री स्टाईल इव्हेंटमध्ये पाचव्या, तर मधू नायरला पुरुषांच्या १०० मीटर बॅकस्ट्रोकमध्ये सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले. (वृत्तसंस्था)
नेमबाजी, बॅडमिंटनमध्ये कांस्य पदके
By admin | Updated: September 22, 2014 04:19 IST