नवी दिल्ली : रिओ आॅलिम्पिकच्या तयारीत व्यस्त असलेली थाळीफेक प्रकारातील खेळाडू सीमा पुनिया हिने रशियात सराव करण्याचा निर्णय घेतला आहे. तिच्या या निर्णयावर भारतीय हौशी अॅथलेटिक्स महासंघाने (एएएफआय) तीव्र नाराजी दर्शविली. रशिया देश डोपिंगचे सर्वात मोठे केंद्र असल्याचे महासंघाचे मत आहे.सीमा सध्या आदिगियाची राजधानी असलेल्या मेकोपमध्ये सराव करीत आहे. सोशल मीडिया साईटवर रशियाचा माजी आॅलिम्पिक थाळीफेकपटू आणि कोच विताली पिश्चालनिकोव्ह यांच्यासोबत सीमाने स्वत:चा फोटो शेअर केला. आशियाड २०१४ ची सुवर्णविजेती ३२ वर्षांची सीमा म्हणाली, ‘मी राष्ट्रीय डोपिंग संस्था (नाडा), भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई) आणि भारतीय हौशी अॅथलेटिक्स महासंघाच्या अध्यक्षांना ई-मेलद्वारे रशियात सरावासाठी जात असल्याची सूचना दिली होती. शिवाय तेथे वास्तव्य असलेला पत्ता आणि दूरध्वनी क्रमांकदेखील दिला होता. आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मी रशियात असून तेथून थेट रिओत दाखल होणार आहे.’’एएएफआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सीमाचा ई-मेल मिळाल्याच्या वृत्तास दुजोरा दिला. तिने मेलमध्ये रशियात सरावाची योजना असल्याचे कळविले, पण महासंघाने तिला मान्यता दिली नाही. आमच्या मान्यतेआधीच व ई-मेलच्या उत्तराची प्रतीक्षा न करता ती रशियाला रवाना झाली.’’दुसरीकडे सीमा म्हणाली, ‘‘सर्वांत मोठ्या प्रमाणावर डोपिंग होत असलेला रशिया हा एकमेव देश आहे. त्यामुळे मी तेथे विनापरवानगी सराव कशी काय करू शकते? रशियात सरावासाठी परवानगी घेतली का, असे विचारताच सीमा म्हणाली, ‘‘माझ्या मते परवानगी घेणे आवश्यक नाही. गोळाफेकीतील खेळाडू मनप्रित कौर, थाळीफेकपटू विकास गौडा, गोळाफेकपटू इंदरजितसिंग हे वैयक्तिक सरावात गुंतले आहेत. ते राष्ट्रीय शिबिरातही नव्हते. त्यांचे स्वत:चे वेळापत्रक आहे. रशियात सरावाचा खर्च मी स्वत:च्या खिशातून करीत आहे. सरकारने ‘टार्गेट आॅलिम्पिक पोडियम’ योजनेंतर्गत अमेरिकेत सरावाचा खर्च दिला, पण रशियातील सरावाचा नव्हे.’’विताली पिश्चालनिकोव्ह हे दाया पिश्चालनिकोव्ह हिचे वडील आहेत. दाया लंडन आॅलिम्पिकदरम्यान डोपिंगमध्ये दोषी आढळताच तिचे रौप्यपदक परत घेण्यात आले होते. सीमा म्हणाली, ‘‘विताली पिश्चालनिकोव्ह माझे कोच नाहीत. मी त्यांच्याकडून सरावादरम्यान टिप्सदेखील घेतलेल्या नाहीत. त्यांनी मला केवळ सराव सुविधा, महिनाभर राहण्यासाठी स्थान शोधून देण्यात मदत केली. माझे पती अंकुश पुनिया हेच माझे कोच आहेत.’’(वृत्तसंस्था)
सीमाचा रशियात सराव; अॅथलेटिक्स फेडरेशन नाराज
By admin | Updated: July 20, 2016 04:50 IST