इंदूर : मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात काळ्या हरणाच्या शिकारप्रकरणी अटक करण्यात आल्यानंतर युवा अष्टपैलू रमीज खान याला रणजी संघातील स्थान गमवावे लागले. त्याची कारकीर्द आता अडचणीत आली आहे. मध्य प्रदेश क्रिकेट संघटनेने (एमपीसीए) बंगालविरुद्ध ३ ते ७ फेब्रुवारी या कालावधीत मुंबईत खेळल्या जाणाऱ्या रणजी उपांत्यपूर्व फेरीसाठी १६ खेळाडूंचा संघ जाहीर केला असून, त्यातून रमीजला (२६) वगळले आहे. याबाबत विचारले असता एमपीसीएचे सचिव मिलिंद कनमडीकर म्हणाले, ‘‘आम्ही रणजी उपांत्यपूर्व फेरीसाठी रमीजचा मध्य प्रदेश संघात समावेश केलेला नाही. कारण तो काळ्या हरणाच्या शिकारप्रकरणी तुरुंगात असल्यामुळे निवडीच्या वेळी उपस्थित नव्हता.’’रमीज, त्याचे वडील महमूद खान आणि त्यांच्या दोन सहकाऱ्यांना सागर जिल्ह्यात काळ्या हरणाच्या शिकारीच्या आरोपाखाली वन्यजीव संरक्षण अधिनियमांतर्गत १० जानेवारी रोजी रात्री अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून या दुर्मिळ वन्यप्राण्याच्या शवाचे अवशेष, रायफल, जिवंत काडतूस आणि चाकू आदी वस्तू जप्त करण्यात आल्या. रमीजचे वडील महमूद खान मध्य प्रदेशचे माजी प्रथम श्रेणी क्रिकेटपटू आहेत. सध्या ते एमपीसीए अंडर-२३ पुरुष संघाच्या निवड समितीचे सदस्य आहेत. सागर येथील वनाधिकारी (डीएफओ) डॉ. शिवप्रसाद तिवारी यांनी सांगितले, की काळ्या हरणाच्या शिकारप्रकरणी चारही आरोपींची जामीन याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.तिवारी यांनी पुढे सांगितले, ‘‘काळ्या हरणाच्या शिकारप्रकरणी अटकेत असलेल्या महमूद व त्यांचा मुलगा रमीज यांच्याविरुद्ध योग्य पाऊल उचलण्यात यावे, असे गेल्या महिन्यात एमपीसीएला पत्राद्वारे कळविण्यात आले आहे.’’दरम्यान, डीएफओच्या पत्रानंतरही एमपीसीएने अद्याप याप्रकरणी पिता-पुत्रावर कुठलीही कारवाई केलेली नाही. याबाबत विचारले असता कनमडीकर म्हणाले, ‘‘आम्ही या प्रकरणात वकिलांचा सल्ला घेत असून, एमपीसीए योग्य ते पाऊल उचलणार आहे.’’(वृत्तसंस्था)काळ्या हरणाच्या शिकारप्रकरणी अटक होण्यापूर्वी रमीजचा मध्य प्रदेश रणजी संघाच्या प्रमुख खेळाडूंमध्ये समावेश होता. त्याने २०११ मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. या डावखुऱ्या फलंदाजाने मध्य प्रदेश संघाचे२६ प्रथम श्रेणी सामन्यांत प्रतिनिधित्व करताना १,१६९ धावा फटकावल्या आहेत. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये आठ बळीही घेतले आहेत.
काळ्या हरणाची शिकार भोवली
By admin | Updated: February 2, 2016 03:18 IST