मेलबोर्न : उपांत्यपूर्व फेरीत राफेल नदालला पराभूत करून धक्कादायक निकालाची नोंद करणाऱ्या टॉमस बर्डिचने २०१३ सालच्या आॅस्ट्रेलियन ओपन किताब पटकावणाऱ्या अँडी मरेला सेमीफायनलमध्ये विजयासाठी झुंजवले. मात्र, अनुभवाची शिदोरी सोबत असलेल्या मरेने तीन तास २६ मिनिटे चाललेल्या सामन्यात ६-७ (६-८), ६-०, ६-३, ७-५ अशी बाजी मारून फायनलमध्ये ऐटीत प्रवेश केला. चौथ्या सेटमध्ये विजयी गुण संपादन करताच मरेने जल्लोष साजरा केला. प्रेक्षक गॅलरीत उभ्या असलेल्या मरेची प्रेयसी किम सेरस हिनेही उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात विजयाचा आनंद साजरा केला. मरेचा अंतिम सामना अव्वल मानांकित नोवाक जोकोविच आणि गतविजेत्या स्टान वावरिंका यांच्यातील विजेत्याशी होईल. २०१३ सालानंतर पहिल्यांदा एखाद्या ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्याची मरेची ही पहिलीच वेळ आहे. विम्बल्डनच्या त्या अंतिम लढतीत मरेने जोकोविचचे आव्हान परतवले होते. आज, गुरुवारी रंगलेल्या सेमीफायनलमध्ये बर्डिचने आपली विजयी घोडदौड कायम राखण्याच्या दृष्टीने सुरुवात केली. मरेच्या सर्व्हिसवर अचूकपणे पलटवार करून बर्डिचने पहिल्या सेटमध्ये वर्चस्व गाजवले. मरेनेही सडेतोड उत्तर देत सेट टायब्रेकरमध्ये खेचला. नदालला पराभूत करून मनोबल उंचावलेल्या बर्डिचने हा सेट जिंकून सामन्यात आघाडी घेतली. याचे दडपण मरेवर जाणवेल, असे वाटत होते; परंतु मरेचा खेळ उंचावत गेला. ७६ मिनिटांच्या पहिल्या सेटमध्ये पराभूत झाल्यानंतर मरेने पुढील दोन्ही सेट अनुक्रमे ३० व ४४ मिनिटांत जिंकून २-१ अशी आघाडी घेतली. चौथ्या सेटमध्ये मात्र काँटे की टक्कर पाहायला मिळाली. कधी बर्डिच आघाडीवर होता, तर कधी मरे. ५-५ अशा बरोबरीत येताच मरेने सहावा गेम जिंकून आघाडी मिळवली. सातव्या गेममध्ये बर्डिच आघाडी मुसंडी मारेल, असे वाटत असतानाच मरेने आक्रमक खेळ केला आणि हा गेम जिंकून सेट आपल्या नावावर केला. (वृत्तसंस्था)
अँडी मरेला विजयासाठी बर्डिचने झुंजवले
By admin | Updated: January 30, 2015 00:49 IST