बिलबाओ : पाच वेळेसचा वर्ल्ड चॅम्पियन विश्वनाथन आनंद बिलबाओ बुद्धिबळ मास्टर्स फायनलच्या पहिल्या फेरीत हॉलंडच्या अनीश गिरी याच्याविरुद्ध दोन हात करेल. आनंद या स्पर्धेत २१ वर्षीय गिरी, २२ वर्षीय अमेरिकेच्या वेसले सो आणि २३ वर्षीय चीनच्या लिरेन डिंग याच्याविरुद्ध खेळेल. या स्पर्धेत फुटबॉलसारख्या स्कोरिंग व्यवस्थेनुसार जिंकणाऱ्या खेळाडूला तीन गुण मिळणार आहे, तर ड्रॉ राहिला तर एक गुण दिला जाणार आहे. खेळाडू स्वत:हून सामना बरोबरीत ठेवण्याचा प्रस्ताव ठेवू शकत नाही. मध्यस्थाचा हस्तक्षेप अथवा फिडेच्या नियमानुसारच ड्रॉविषयीचा निर्णय घ्यावा लागणार आहे.ही स्पर्धा सहा फेऱ्यांची असणार आहे. त्यात प्रत्येक खेळाडूला एकमेकांशी दोनदा खेळावे लागणार आहे. त्यात पहिल्या ४0 चालींसाठी ९0 मिनिटे आणि पुन्हा डाव संपल्यानंतर ६0 मिनिटे दिली जाणार आहेत. तसेच ४१ चालीनंतर प्रत्येक चालीसाठी दहा अतिरिक्त सेकंद दिले जाणार आहेत.गेल्या हंगामात आनंदने ११ गुणांसह विजेतेपद पटकावले होते, तर आर्मेनियाच्या लेवोन आरोनियन याचे दहा गुण होते. आनंद याआधीही कामगिरीची पुनरावृत्ती करण्यास आतुर असेल. तथापि, त्याच्यासाठी तितके सोपे नाही. गिरीदेखील तुल्यबळ खेळाडू मानला जात आहे. प्रारंभीच्या डावातील विजयाने त्याचा आत्मविश्वास उंचावेल. डिंगलादेखील पराभूत करणे सोपे नाही. तो कडवे आव्हान देऊ शकतो. डिंग आणि वेसले सो यांनीदेखील नुकत्याच झालेल्या विश्व बुद्धिबळ स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे.(वृत्तसंस्था)
बिलबाओत पहिल्या फेरीत आनंद गिरीविरुद्ध खेळणार
By admin | Updated: October 26, 2015 23:01 IST