इंदूर : भारतात क्रिकेटमध्ये पारदर्शिता व सुधारणा आणण्यासाठी सर्वोच्च न्यायालयातर्फे नियुक्त सेवानिवृत्त न्यायमूर्ती आर.एम. लोढा समितीच्या शिफारशींवर भाष्य करण्यास बंगाल क्रिकेट संघटनेचे (कॅब) अध्यक्ष व भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी नकार दिला. याबाबतचा निर्णय बीसीसीआय घेईल, असे त्यांनी सांगितले. मध्यप्रदेश क्रिकेट संघटनेच्या (एमपीसीए) वार्षिक पुरस्कार वितरण समारंभात सहभागी होण्यासाठी येथे आलेला गांगुली सोमवारी रात्री पत्रकारांसोबत बोलताना म्हणाला,‘लोढा समितीच्या शिफारशींबाबत बीसीसीआय निर्णय घेईल. बीसीसीआयच्या निर्र्देशानुसार आम्ही कार्य करू. आम्हाला थोडा वेळ मिळणे आवश्यक आहे. याबाबतचा तिढा सोडवण्यासाठी थोडा वेळ लागेल. भविष्यात काय घडते, याबाबत उत्सुकता आहे.’माजी क्रिकेटपटू व विद्यमान क्रिकेट प्रशासक म्हणून लोढा समितीच्या शिफारशींवर तुमची प्रतिक्रिया काय असेल, याबाबत बोलताना गांगुली म्हणाला,‘सर्वोच्च न्यायालयाने याबाबत निर्णय दिला आहे. त्यामुळे यावर सार्वजनिक भाष्य करणे योग्य ठरणार नाही.’(वृत्तसंस्था)
तो निर्णय बीसीसीआय घेईल : सौरव गांगुली
By admin | Updated: August 3, 2016 04:21 IST