बीसीसीआय : मुंबईतील बैठकीत होईल चर्चा
मुंबई : येथे ९ नोव्हेंबरला होणाऱ्या आपल्या वार्षिक सर्वसाधरण सभेमध्ये (एजीएम) भारतीय क्रिकेट नियामक मंडळचे (बीसीसीआय) अधिकारी वेस्ट इंडिजवर लावलेली बंदी हटविण्याच्या निर्णयावर चर्चा करू शकतात. गेल्या वर्षी आॅक्टोबर महिन्यात भारत दौऱ्यावर आलेल्या वेस्ट इंडिज संघाने मध्यावरच मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर बीसीसीआयने वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्ड (डब्ल्यूआयसीबी)विरुद्ध तब्बल ४.१९ कोटी डॉलरचा मानहानी खटला भरून माजी बीसीसीआय सचिव संजय पटेल यांनी डब्ल्यूआयसीबीला नोटीस पाठवली होती.यानंतर डब्ल्यूआयसीबीने बीसीसीआयसह चर्चा करून इतक्या मोठ्या रकमेची भरपाई देण्यास असमर्थ असल्याचे सांगितले होते. यामुळे दोन्ही देशांतील क्रिकेट संबंध अडचणीत आले होते. गेल्या महिन्यात १७ तारखेला डब्ल्यूआयसीबीचे अध्यक्ष डेव कॅमरन व मुख्य कार्यकारी मायकल मुझरहेड यांनी मुंबईत बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. यानंतर दोन्ही देशांतील क्रिकेट संबंध सुधारतील, अशी आशा व्यक्त केली गेली. या बैठकीनंतरच्या दुसऱ्याच दिवशी बीसीसीआयने आपल्या बैठकीत डब्ल्यूआयसीबीसह झालेल्या चर्चेची माहिती देताना सांगितले होते, की दौरा अर्धवट सोडल्याप्रकरणी डब्ल्यूआयसीबीने माफी मागतली असून, नुकसानभरपाई देण्यास असमर्थ असल्याचे स्पष्ट केले. त्याच वेळी वेस्ट इंडिज बोर्डाने २०१७मध्ये भारत दौरा करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. (वृत्तसंस्था)