बंगळुरू : उस्मान ख्वाजाच्या कारकिर्दीतील पहिल्या अर्धशतकाच्या बळावर आॅस्ट्रेलियाने आयसीसी टी-२० विश्वचषकाच्या सुपर टेन सामन्यात सोमवारी बांगलादेशचा ३ गड्यांनी पराभव केला. आॅस्ट्रेलियाने या पहिल्या विजयासह उपांत्य फेरीच्या आशा जिवंत ठेवल्या. बांगलादेशचा दुसरा पराभव झाल्याने उपांत्य फेरीच्या आशा क्षीण झाल्या.चिन्नास्वामी स्टेडियममध्ये खेळल्या गेलेल्या लढतीत बांगलादेशच्या १५६ धावांचा पाठलाग करणाऱ्या आॅस्ट्रेलियाने ख्वाजाच्या ४५ चेंडूंतील सात चौकार व एका षटकारासह काढलेल्या ५८ धावांमुळे १८.३ षटकांत ७ बाद १५७ धावा करीत सामना जिंकला. ख्वाजाने वॉटसनसोबत (२१) सलामीला ६२ धावा केल्या. ग्लेन मॅक्सवेलने १५ चेंडूंत दोन षटकार आणि दोन चौकारांसह २६ धावा केल्या. बांगलादेशकडून शाकीब-अल-हसन याने २७ धावा देत ३ आणि मुस्तफिजूर रहमान याने ३० धावांत २ गडी बाद केले.तत्पूर्वी आॅस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्हन स्मिथने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारण्याचा निर्णय घेतला. वॉटसनने सौम्या सरकारला (१) झटपट माघारी परतवत कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवला. मोहम्मद मिथुन (२३) व शब्बीर रहमान (१२) यांनी दुसऱ्या विकेटसाठी २३ धावांची भागीदारी करीत बांगलादेशचा डाव सावरला. वॉटसनने शब्बीरला माघारी परतवत ही भागीदारी संपुष्टात आणली. मिथुन व शाकिब अल-हसन यांनी संघाला अर्धशतकाची वेस ओलांडून दिली. शुवागत होम (१३) मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. शाकिबचा अडथळा जंपाने दूर केला. त्यानंतर महमुदुल्ला व मुशफिकर रहीम (१५) यांनी २८ चेंडूंमध्ये सहाव्या विकेटसाठी ५१ धावांची अभेद्य भागीदारी करीत संघाला दीडशेचा पल्ला ओलाडूंन दिला. (वृत्तसंस्था)> संक्षिप्त धावफलकबांगलादेश : २० षटकांत ५ बाद १५६ (महमुदुल्ला नाबाद ४९, शाकिब-अल-हसन ३३, मोहम्मद मिथुन २३, मुशफिकर रहीम नाबाद १५; जंपा ३-२३, वॉटसन २-३१). आॅस्ट्रेलिया : १८.३ षटकांत ७ बाद १५७ : (उस्मान ख्वाजा ५८, शेन वॉटसन २१, स्टिव्हन स्मिथ १४, डेव्हिड वॉर्नर १७, ग्लेन मॅक्सवेल २६, मुस्तफिजूर २/३०, शाकीब अल हसन ३/२७, अल आमीन १/१४)
आॅस्ट्रेलियाचा पहिला विजय
By admin | Updated: March 22, 2016 02:56 IST