सेंट जोन्स : बॉलिवूडला सध्या सुपरस्टार रजनीकांत यांच्या ‘कबाली’ या नव्या चित्रपटाने अक्षरश: वेड लावले आहे. तिकडे सातासमुद्रापलीकडे वेस्ट इंडीज दौऱ्यावर असलेल्या भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू रवीचंद्रन अश्विन आणि सुरेश रैना यांच्यावरदेखील रजनीकांत यांच्या या बहुचर्चित चित्रपटाने चांगलीच जादू केली.चेन्नईचा नागरिक असलेल्या अश्विनने दक्षिणात्य स्टार ६५ वर्षांचे रजनीकांत यांच्या कबाली चित्रपटाबाबत सोशल मीडियावर पोस्ट टाकताना आपण रजनीचे चाहते असल्याचे जाहीर केले. याशिवाय त्याने अन्य एका चित्रपटाचे छायाचित्र टिष्ट्वटरवर शेअर केले. त्यातील कॅरेक्टर पूजापाठ करताना दिसत आहेत. अश्विनने त्यावर संघातील सहकारी विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल आणि कोच अनिल कुंबळे यांची नावे लिहिली.जगभरात पसरलेल्या रजनीकांत यांच्या कोट्यवधी चाहत्यांसारखेच कबाली चित्रपटाबाबत आपणदेखील उत्सुक असल्याचे सांगून शुक्रवारी चित्रपटगृहात रिलिज झालेला हा चित्रपट पाहण्याचे आवाहन केले आहे. या चित्रपटाची द. भारतात गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा होती. शुक्रवारी चित्रपट प्रदर्शित होणार असे जाहीर होताच अनेक कार्पोरेट कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी शुक्रवारची सुटी जाहीर केली. अश्विनसारखाच अष्टपैलू सुरेश रैना याने चित्रपटाबाबतची आपली उत्सुकता इन्स्टाग्रामवर पोस्ट केली. रैना याने या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले असून, त्यात लिहिले..., उत्कृष्ट चित्रपट! शुक्रवारी पहिल्याच दिवशी पहिला शो!’रैना आणि अश्विन यांनी याआधी आपल्या आयपीएलच्या चेन्नई सुपरकिंग्ससाठी अन्य सहकाऱ्यांसोबत रजनीकांत यांची बहुचर्चित स्टाईल ‘तलायवा’वर एक व्हिडिओ तयार केला होता. या व्हिडिओत दोघेही सहकाऱ्यांना रजनीकांत यांच्यासारखा चष्मा घालण्याची स्टाईल शिकविताना दिसत आहेत. (वृत्तसंस्था)
अश्विनवर कबाली फिव्हर... रैनाने पाहिला फर्स्ट डे फर्स्ट शो...
By admin | Updated: July 23, 2016 05:23 IST