नवी दिल्ली : भारताचा फिरकी गोलंदाज रविचंद्रन आश्विन याची गुरुवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून निवड केली. याशिवाय कसोटीमधील सर्वोत्कृट क्रिकेटपटू म्हणूनही त्याची निवड करण्यात आली. दक्षिण आफ्रिकेचा यष्टिरक्षक क्विंटन डी कॉक वन-डे क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला. आश्विनला सर गारफिल्ड सोबर्स ट्रॉफीने गौरविण्यात येईल.ही ट्रॉफी जिंकणारा आश्विन भारतात तिसरा तसेच जगात १२ वा खेळाडू ठरला. याआधी २००४ मध्ये राहुल द्रविड आणि २०१० मध्ये सचिन तेंडुलकर यांना हा सन्मान मिळाला होता. आयसीसीच्या वतीने पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यंदाचा सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार कोणता खेळाडू पटकावणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. यामध्ये आश्विनने बाजी मारली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटविश्वात १४ सप्टेंबर २०१५ ते २० सप्टेंबर २०१६ या कालावधीत केलेल्या सर्वोत्कृष्ट कामगिरीच्या आधारावर पुरस्कार दिले जातात. आश्विनने नुकतीच इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत जबरदस्त कामगिरी केली होती. आयसीसी कसोटी संघाचे नेतृत्व इंग्लंडच्या अॅलिस्टर कूक याला देण्यात आले असून संघात आर. आश्विन या केवळ एकाच भारतीय खेळाडूला स्थान देण्यात आले आहे. दुसरीकडे आयसीसी वन डे संघात विराट कोहली याची कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. संघात रवींद्र जडेजा आणि रोहित शर्मा यांना स्थान मिळाले.पाकिस्तान कसोटी संघाचा कर्णधार मिस्बा उल हक याला ‘स्पिरीट आॅफ क्रिकेट’ हा पुरस्कार देण्यात आला. वेस्ट इंडीजचा कार्लोस ब्रेथवेटला टी-२० ‘परफॉर्मर्स आॅफ द ईयर’ आणि बांगलादेशचा मुस्तिफिजूर रहमानला ‘युवा प्रतिभावान’ खेळाडू म्हणून निवडण्यात आले. सर्वोत्कृष्ट पंच म्हणून मरेइस इरॅस्मस यांची निवड झाली आहे. आयसीसीच्या सहयोगी देशांतील सर्वोत्कृष्ट खेळाडू अफगाणिस्तानचा मोहम्मद शहजाद ठरला. महिलांमध्ये सर्वोत्कृष्ट एकदिवसीय आणि टी-२० खेळाडू म्हणून न्यूझीलंडची सुझी बेट्सची निवड झाली. (वृत्तसंस्था)आश्विनची कामगिरी...आश्विनने १४ सप्टेंबर २०१५ ते २० सप्टेंबर २०१६ या काळात आठ कसोटीत ४८ बळी घेतले आणि ३३६ धावा ठोकल्या. या दरम्यान १९ टी-२० मध्ये त्याने २७ गडी बाद केले. २०१५ अखेरीस तो जगातील नंबर वन कसोटी गोलंदाज होता. २०१६ मध्ये दोन वेळा तो या पोझिशनवर पोहोचला. तो अद्यापही जगात नंबर वन कसोटी गोलंदाज आहे.या प्रतिष्ठेच्या सन्मानामुळे मी आनंदी आहे. हा पुरस्कार कुटुुंबाला समर्पित करतो. याशिवाय सहकारी आणि सहयोगी स्टाफची भूमिका देखील मोलाची ठरली आहे. गेल्या दोन वर्षांत माझी कामगिरी फार चांगली झाली. मी फलंदाजी अािण गोलंदाजीत पार पाडलेली भूमिका यात मोलाची ठरली आहे. - रविचंद्रन आश्विनसर गारफिल्ड सोबर्स ट्रॉफीचे मानकरीअॅन्ड्र्यू फ्लिन्टॉप आणि जॅक कालिस संयुक्त विजेते २००५, रिकी पाँटिंग २००६ व २००७, मिशेल जॉन्सन २००९ व २०१४, जोनाथन ट्रॉट २०११, कुमार संगकारा २०१२, मायकेल क्लार्क २०१३, स्टीव्ह स्मिथ २०१५.
आश्विन ‘सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू’!
By admin | Updated: December 23, 2016 01:33 IST