रायपूृर : सलग तिसऱ्या सामन्यात केलेल्या दोन गोलच्या जोरावर गोंजालो पिलाट याने एफआयएच हॉकी वर्ल्ड लीग फायनल्स स्पर्धेत अर्जेंटिनाला आॅलिम्पिक चॅम्पियन जर्मनीविरुद्ध ३-१ असा धमाकेदार विजय मिळवून दिला. या शानदार विजयासह स्पर्धेच्या ‘ब’ गटात अर्जेंटिनाने आपले दुसरे स्थान निश्चित केले आहे.सोमवारी रात्री सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात पिलाटने जबरदस्त आक्रमण करताना एकहाती वर्चस्व राखले. त्याने १७व्या आणि ५१व्या मिनिटाला संघाकडून निर्णायक गोल नोंदविले. विशेष म्हणजे, सलग तिसऱ्या सामन्यात त्याने अर्जेंटिनासाठी दोन गोल करण्याची कामगिरी केली. या धमाकेदार कामगिरीसाठी त्याला सामनावीर म्हणून निवडण्यात आले.१७व्या मिनिटाला मिळालेला पेनल्टी कॉर्नर सत्कारणी लावताना पिलाटने अर्जेंटिनाला १-० असे आघाडीवर नेले. मात्र, यानंतर लगेच जर्मनीच्या वेलेन निकलसने २६व्या मिनिटाला अप्रतिम गोल करून सामना १-१ असा बरोबरीवर आणला. यानंतर दोन्ही संघांनी बचावावर अधिक भर दिल्याने मध्यंतराला सामना बरोबरीत राहिला. दुसऱ्या सत्रात मात्र अर्जेंटिनाच्या आक्रमकांचा बोलबाला राहिला. माटियास परेडेस याने ५०व्या मिनिटाला गोल करून अर्जेंटिनाला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. तर, यानंतरच्या पुढच्याच मिनिटाला पिलाटने पुन्हा एकदा आपला हिसका दाखविताना पेनल्टी कॉर्नरची संधी साधून संघाला ३-१ अशी विजयी आघाडी मिळवून दिली. या वेळी पूर्णपणे वर्चस्व राखलेल्या अर्जेंटिनाने जर्मनीला पुनरागमनाची एकही संधी न देता विजयावर शिक्कामोर्तब केले. (वृत्तसंस्था)
पिलाटच्या जोरावर अर्जेंटिनाची आगेकूच
By admin | Updated: December 2, 2015 04:06 IST