मुंबई : अंधांच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक बुधवारी क्रिकेट असोसिएशन फॉर दी ब्लाइंड इन इंडियाने (कॅबी) जाहीर केले. ३१ जानेवारी ते १२ फेब्रुवारी २०१७ दरम्यान भारतात होणाऱ्या या स्पर्धेत १० संघ विजेतेपदासाठी लढतील. भारताचे माजी कर्णधार आणि मुंबई क्रिकेट संघटनेचे (एमसीए) उपाध्यक्ष दिलीप वेंगसरकर यांच्या हस्ते यावेळी स्पर्धेचे वेळापत्रक प्रसिध्द करण्यात आले.वेंगसरकर यांनी अंधांच्या क्रिकेटला आपला पुर्ण पाठिंबा असल्याचे स्पष्ट करताना सांगितले की, ‘या स्पर्धेसाठी एमसीए सर्व सामन्यांचे आयोजन करण्यास तयार आहे. मुंबईत आमच्याकडे चार मैदाने आहेत. अंधांच्या क्रिकेटसाठी आमच्याकडून हे छोटे योगदान असेल. राहुल द्रविड ब्रँड अॅम्बेसेडर असलेल्या या क्रिकेटच्या भव्य यशाची अपेक्षा आहे.’२८ जानेवारीला परदेशी संघांचे भारतात आगमन होणार असून ३१ जानेवारीला स्पर्धेचा सलामिचा सामना भारत वि. वेस्ट इंडिज यांच्यामध्ये दिल्लीला खेळविण्यात येईल. याच ठिकाणी यानंतर पाकिस्तान वि. इंग्लंड यांच्यात सामना होईल. तर, १२ फेब्रुवारीला स्पर्धेचा अंतिम सामना खेळविण्यात येईल. यजमान भारत या स्पर्धेत गतविजेता म्हणून सहभागी होणार असून यंदाही भारताकडे विजेतेपदाचा प्रबळ दावेदार म्हणून पाहिले जात आहे. या स्पर्धेचे सामने दिल्ली, मुंबई, फरीदाबाद, गुजरात, कोच्ची, भुवनेश्वर, आंध्र प्रदेश व बंगळुरु येथे खेळविण्यात येतील. त्याचप्रमाणे, अंधांच्या क्रिकेटला मान्यता मिळण्याबाबत आम्ही बीसीसीआयकडे विनंती केली असून वेंगसरकर आणि स्पर्धेचा ब्रँड अॅम्बेसेडर राहुल द्रविड यांच्याकडून यासाठी मदत घेतली जाणार आहे,’ असे कॅबीचे अध्यक्ष जीके महंतेश यांनी यावेळी सांगितले. (क्रीडा प्रतिनिधी)
विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर
By admin | Updated: November 17, 2016 02:05 IST