बंगळुरु : गतमहिन्यात हॉटेलमधील रूममध्ये एका महिलेला मारहाण व शिवीगाळ गेल्याप्रकरणी मंगळवारी बंगळुरू पोलिसांनी भारतीय फिरकीपटू अमित मिश्राला अटक केली. यानंतर लगेच त्याची जामिनावर सुटका करण्यात आली.मागील महिन्यात पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी मिश्राला समन्स दिले होते. त्यानुसार सात दिवसांमध्ये त्याला पोलिसांपुढे हजर राहण्यास सांगितले होते. या समन्सनुसार मिश्राने आपली उपस्थिती दर्शवली होती. विशेष म्हणजे ज्यावेळी हे प्रकरण समोर आले तेव्हा पीडित महिलेने आपण ही तक्रार मागे घेत असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, तिने असे केले नाही. त्या महिलेने सांगितले होते, की मी पोलीस स्टेशनमध्ये मिश्राच्या येण्याच्या प्रतीक्षेत असून, आम्ही सहमतीने हे प्रकरण मिटवू. आमच्यामध्ये वाद झाला असला, तरीही आम्ही पूर्वीप्रमाणे मित्र आहोत. २७ नोव्हेंबरला या प्रकरणी तक्रार केलेल्या या महिलेने आपण मिश्राला ३ महिन्यांपासून ओळखत असल्याचा दावा केला होता. तसेच गतमहिन्यात भारतीय संघ सराव शिबिरासाठी बंगळुरु येथे ज्या हॉटेलमध्ये थांबलेला होता, त्याच हॉटेलच्या एका रूममध्ये ही घटना घडली होती, असेही त्या महिलेने सांगितले.तक्रारीमध्ये म्हटले होते, की मिश्राच्या अनुपस्थितीमध्ये त्या महिलेने मिश्राच्या रूममध्ये प्रवेश केला होता. त्याच वेळी मिश्राही तेथे पोहोचल्यानंतर दोघांमध्ये मोठा वाद झाला. महिलेने आरोप केला होता, की मिश्राने तिला मारहाण व शिवीगाळ केली. यानंतर एफआयआर नोंदवण्यात आला होता. मिश्रा विरुद्ध ३५४ कलमांतर्गत विनयभंग आणि ३२३ आणि ३२४ अंतर्गत मारहाणीची तक्रार नोंदवण्यात आली होती. (वृत्तसंस्था)
अमित मिश्राला अटक; जामिनावर सुटका
By admin | Updated: October 27, 2015 23:52 IST