मुंबई : नागपूर येथील ज्येष्ठ वकील शशांक मनोहर यांची रविवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. मनोहर यांच्या निवडीमुळे श्रीमंत क्रीडा संघटना असलेल्या बीसीसीआयमध्ये नव्या युगाची सुरुवात झाली आहे.नामांकन अर्ज सादर करण्याची मुदत शनिवारी संपल्यानंतर मनोहर यांचा एकमेव अर्ज होता. त्याच वेळी त्यांची निवड निश्चित झाली. रविवारी झालेल्या बीसीसीआयच्या सर्वसाधारण सभेत त्यावर शिक्कामोर्तब झाले. जगमोहन दालमिया यांच्या निधनानंतर बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी पोटनिवडणूक घेणे आवश्यक होते. मनोहर यांच्या नावाचा प्रस्ताव दालमिया यांचे चिरंजीव अभिषेक यांनी ठेवला, हे विशेष. अभिषेक यांनी दालमिया यांचा कौटुंबिक क्लब एनसीसीचे प्रतिनिधित्व केले. या वेळी अध्यक्षपदासाठी प्रस्ताव ठेवण्याचा अधिकार पूर्व विभागाला होता. तेथील केवळ एका सूचकाची गरज असताना सर्व सहा संलग्न संघटनांनी सर्वसंमतीने मनोहर यांच्या उमेदवारीचे समर्थन केले. त्यामुळे बीसीसीआयच्या राजकारणात श्रीनिवासन यांची पकड सैल झाल्याची प्रचिती आली. श्रीनिवासन बैठकीमध्ये सहभागी झाले नाहीत. तामिळनाडू क्रिकेट संघटनेचे प्रतिनिधित्व पी.एस. रमन यांनी केले. (वृत्तसंस्था)मनोहर यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ २०१७मध्ये संपणार आहे. तोपर्यंत बीसीसीआयच्या राजकारणामध्ये पुनरागमन करण्याची श्रीनिवासन यांच्याकडे संधी नाही. बीसीसीआय बोर्डाचे सचिव अनुराग ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील एक गट मनोहर यांच्या उमेदवारीचे समर्थन करीत होता. गेल्या आठवड्यात दिल्ली येथे अरुण जेटली यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर मनोहर यांच्यासाठी अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा झाला होता.श्रीनिवासन यांनी बीसीसीआयवर पकड कायम राखण्यास आपल्या मर्जीतील उमेदवारासाठी समर्थन मिळविण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी विरोधी असलेले शरद पवार यांचीही भेट घेतली. मात्र पवार गटाच्या सदस्यांचा विरोध होता.
पुन्हा मनोहर !
By admin | Updated: October 5, 2015 03:49 IST