होबार्ट : क्विंटन डिकाकच्या शतकी खेळीच्या जोरावर २४१ धावांची आघाडी घेणाऱ्या दक्षिण आफ्रिकेने आॅस्ट्रेलियाची दुसऱ्या डावात २ बाद २१२ अशी स्थिती करीत दुसऱ्या कसोटी सामन्यात तिसऱ्या दिवसअखेर आपली बाजू मजबूत केली. दुसऱ्या दिवशी पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ शक्य झाला नाही. डिकाकने १०४ धावांची खेळी केली आणि तेंबा बावुमासोबत (७४) सहाव्या विकेटसाठी १४४ धावांची भागीदारी करीत दक्षिण आफ्रिकेला ३२६ धावांची मजल मारून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. आॅस्ट्रेलियाचा पहिला डाव केवळ ८५ धावांत संपुष्टात आला. डिकाकने १४३ चेंडूंना सामोरे जाताना १७ चौकार ठोकले. बावुमाच्या २०४ चेंडूंच्या खेळीमध्ये ८ चौकारांचा समावेश आहे. आॅस्ट्रेलियातर्फे जोस हेजलवुडने ८९ धावांत ६, तर मिशेल स्टार्कने ७९ धावांत ३ बळी घेतले. आॅस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात दिवसअखेर २ बाद १२१ धावांची मजल मारली होती. उस्मान ख्वाजा (५६) आणि स्टिव्हन स्मिथ (१८) खेळपट्टीवर होते. आॅस्ट्रेलिया संघ अद्याप १२० धावांनी पिछाडीवर आहे. दुसऱ्या डावात आॅस्ट्रेलियाची सुरुवात निराशाजनक झाली. चौथ्या चेंडूवर जो बर्न्स (०) बाद झाला. त्याला केली एबोटने तंबूचा मार्ग दाखवला. सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने (४५) ख्वाजासह दुसऱ्या विकेटसाठी ७९ धावांची भागीदारी करीत डाव सावरला. वॉर्नरला एबोटने बाद केले. ख्वाजा व स्मिथ यांनी सावध पवित्रा स्वीकारीत पडझड थोपवली. (वृत्तसंस्था)
द. आफ्रिकेची पकड मजबूत
By admin | Updated: November 15, 2016 01:16 IST