ड्यूनेडिन : समिउल्ला शेनवारी याने कारकिर्दीत सर्वोच्च ९६ धावांची खेळी करीत अफगाणिस्तानला विश्वचषक लढतीत गुरुवारी स्कॉटलंडवर एका गड्याने विजय मिळवून दिला. प्रथमच विश्वचषक खेळणाऱ्या अफगाणिस्तानने २११ धावांचे लक्ष्य ४९.३ षटकांत नऊ गड्यांच्या मोबदल्यात गाठले. ९७ धावांत सात गडी बाद झाल्यानंतर शरणार्थी शिबिरात राहून क्रिकेटचे धडे घेणाऱ्या शेनवारीने एकाकी संघर्ष करीत सामना खेचून आणला. त्याने सात चौकार आणि पाच षट्कारांसह १४७ चेंडू टोलवित ९६ धावा केल्या. जावेद अहमदी याने ५१ धावांचे योगदान दिले. तिसऱ्यांदा विश्वचषक खेळणारा स्कॉटलंडचा ११ सामन्यांतील हा ११ वा पराभव होता. नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करणाऱ्या अफगाण संघाने स्कॉटलंडचे आठ गडी लवकर बाद केले होते; पण नवव्या गड्यासाठी ६२ धावांची भागीदारी झाल्याने विश्वचषकात पहिल्यांदा या संघाने २०० धावांचा टप्पा गाठला. कर्णधार मोम्पसेन आणि मचान यांनी ६१ चेंडूंत ५३ धावांची भागीदारी केली.
विश्वचषकात घुमला अफगाणचा आवाज
By admin | Updated: February 27, 2015 00:44 IST