कराची : आयसीसी अध्यक्षपदासाठी नामांकित पाकिस्तानी क्रिकेट संघाचे माजी कर्णधार जहीर अब्बास यांनी ते देशात जास्तीत जास्त आंतरराष्ट्रीय संघ आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीच्या (आयसीसी) अध्यक्षपदासाठी मंगळवारी जहीर अब्बास यांचे नाव नामांकित केले आहे. त्याआधी पाकिस्तानी क्रिकेट मंडळाचे माजी अध्यक्ष नजम सेठी यांनी जुलै २0१६ च्या आयसीसी अध्यक्षपदासाठी फक्त माजी खेळाडूंना ठेवण्याचा आयसीसीचा निर्णय पाहता त्यांची उमेदवारी मागे घेतली होती.अब्बास म्हणाले, पाकिस्तानी क्रिकेट मंडळाने माझ्यावर मोठी जबाबदारी सोपवल्याने मला सन्मानित झाल्यासारखे वाटत आहे. मी आयसीसीत पाकिस्तानचे प्रतिनिधित्व करण्यास आतुर आहे. पाकिस्तानसाठी जास्तीत जास्त आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाचा पाठिंबा मिळवण्यासाठी माझा प्रयत्न असेल. झिम्बाब्वेचा नुकताच झालेला दौराही खूप यशस्वी ठरला आहे.’’अब्बास यांच्या नामांकनास मान्यता मिळाल्याचे पीसीबीने म्हटले आहे.पीसीबी अध्यक्ष शहरयार खान आणि बोर्ड आॅफ गव्हर्नर्सने २0१५-१६ च्या आयसीसी अध्यक्षपदासाठी अब्बास यांच्या नामांकनास स्वीकृती दिली असल्याचे पीसीबीतर्फे सांगण्यात आले. अब्बास यांच्या नामांकनावर २२ ते २६ जूनपर्यंत बार्बडोस येथे होणाऱ्या आयसीसी बोर्डच्या बैठकीत विचार केला जाणार आहे. त्यांच्या नावाला स्वीकृती मिळाल्यास ते एक जुलैपासून एक वर्षासाठी हा पदभार सांभाळतील.(वृत्तसंस्था)
पाकमध्ये आंतरराष्ट्रीय सामने आयोजित करणार : अब्बास
By admin | Updated: June 4, 2015 01:18 IST