मुंबई : एखादी वास्तू दीर्घायुषी होते, तशी तिच्या कार्यामुळे प्रतिष्ठा, स्थैर्य, गुणवत्ता वाढीस लागते, हे होत असतानाच लोकांच्या अपेक्षांची जबाबदारीदेखील वाढते, म्हणूनच तिचा सन्मान, विश्वास कायम राहावा, यासाठी लघुवाद न्यायालयाचे न्यायाधीश, अधिवक्ता, तसेच कर्मचारी वर्ग यांनी आपापल्या परीने, तसेच सामूहिकरीत्या योगदान दिले पाहिजे, न्यायदानाचे क्षेत्र अत्यंत मौल्यवान असून, त्याबद्दल समाजाला खूप अपेक्षा असतात. खटल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, त्याचबरोबर तिची गुणवत्ता व विश्वासार्हता, तसेच वास्तूचे ऐतिहासिक महत्त्व यापुढील काळातदेखील जपण्याची जबाबदारी अधिक प्रभावीपणे पार पाडली पाहिजे, असे विचार उच्च न्यायालयाच्या प्रभारी न्यायमूर्ती विजया ताहिलरामानी यांनी व्यक्त केले.फोर्ट येथील लघुवाद न्यायालयाच्या वास्तूला १00 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल विशेष सोहळा पार पडला. त्या वेळी त्या बोलत होत्या. या वास्तूमध्ये महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बॅ. जिना आदींनी वकिली केली आहे. त्याबद्दल, तसेच तेथील जुन्या दुर्मीळ वस्तूंचे एक प्रदर्शनदेखील या निमित्ताने आयोजित करण्यात आले. याप्रसंगी बोलताना उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांनी लघुवाद न्यायालयाच्या प्रतिष्ठेची आणि गुणवत्तेची जबाबदारी यापुढील काळात नव्या पिढीवर अवलंबून आहे, ती त्यांनी जबाबदारीने पार पाडावी, असे आवाहन केले, तसेच भाडे कायदा अधिक सक्षम करण्यास लघुवाद न्यायालयाची महत्त्वाची भूमिका राहिली आहे, असे प्रशंसोद्गारही काढले. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सर्वश्री भूषण गवई, ए. ए. सय्यद व मकरंद कर्णिक यांची विशेष उपस्थिती होती. त्यांनीदेखील लघुवाद न्यायालयाच्या या वास्तूचे महत्त्व सांगत विविध ऐतिहासिक घटनांना उजाळा दिला. लघुवाद न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश मुकुलिका जवळकर यांनी लघुवाद न्यायालय भविष्यातदेखील आपल्या कार्याची महती अशीच कायम ठेवण्यासाठी कटीबद्ध राहील, असा विश्वास दिला. लघुवाद न्यायालयाच्या न्यायाधीश संगीता शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. अॅडव्होकेट असोसिएशनचे अध्यक्ष विजय राजपूत, लघुवाद न्यायालयाचे अतिरिक्त मुख्य न्यायाधीश योगेश राणे, उच्च न्यायालयाचे महाप्रबंधक श्रीनिवास आग्रवाल, श्याम जोशी, लघुवाद न्यायालयाचे मुख्य प्रबंधक पी. बी. सुर्वे, अप्पर प्रबंधक एन. डब्ल्यू. सावंत, एन. व्ही. शहा, लघुवाद न्यायालयाचे माजी न्यायाधीश, वकील, कर्मचारी वर्ग या सोहळ्यास उपस्थित होते.
लघुवाद न्यायालयाचा ऐतिहासिक वारसा जपा - विजया ताहिलरामानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 07:13 IST