कळंबोली : विद्यार्थ्यांना ज्ञानाचे धडे देणाऱ्या कळंबोलीतील केएलई महाविद्यालयामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मंगळवारी योगसाधनेची दीक्षा देण्यात आली. या उपक्र माला विद्यार्थ्यांनी भरघोस प्रतिसाद दिला. यावेळी अनेकांनी दररोज योगसाधना करण्याचा संकल्प केला. गतवर्षीपासून २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून जाहीर करण्यात आला. वर्षात सर्वात मोठा दिवस असणाऱ्या या दिवसाची सुरुवात लवकरच झाली. पनवेल परिसरात अनेक ठिकाणी योग शिबिराचे आयोजन करून हा दिवस साजरा करण्यात आला.कामोठे वसाहतीतील सुषमा पाटील विद्यालयात सुध्दा योग दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे माध्यम प्रायोजक लोकमत होते. कळंबोली येथील केएलई महाविद्यालयात योग शिक्षक स्नेहल पाटील यांनी विद्यार्थ्यांना योग विद्येचे धडे दिले. शिक्षकांनीही प्राणायामाबरोबरच विविध योगासने करीत आपला सहभाग नोंदवला. प्राचार्या ज्योती मार्व्हा, ईला अथय्या, भाजपाचे पनवेल तालुका चिटणीस अशोक मोटे, पोलीस निरीक्षक प्रदीप गिरधर यावेळी उपस्थित होते. अशोक मोटे यांनी योगदिवसाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या, त्याचबरोबर दररोज योग केल्याचा आरोग्याला फायदाच आहे. विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती, उत्साह वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. उत्तम आरोग्याकरिता योगाचे महत्त्व सांगून ज्योती मार्व्हा यांनी विद्यार्थ्यांनी दररोज योग करण्याचे आवाहन केले. योग दिनानिमित्त महाविद्यालयाच्या संकुलात वृक्षारोपण करण्यात आले.पतंजली योग परिवाराच्या वतीने कामोठे येथील कराडी समाज हॉलमध्ये योगदिवस साजरा करण्यात आला होता. धावपळ व धकाधकीच्या जीवनशैलीमुळे मानसिक ताण वाढला आहे, त्यामुळे लहान वयात गंभीर व्याधी जडत आहेत. हा ताण, व्याधी कमी करायचा असल्यास योगसाधना किंवा ध्यानधारणा उपयुक्त असल्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी सांगितले. योगाभ्यासाचा प्रचार व प्रसार हाच योगदिनाच्या आयोजनाचा मुख्य उद्देश आहे. नियमित योगासने करून आरोग्य उत्तम ठेवण्याचा सल्ला यावेळी त्यांनी उपस्थितांना दिला. यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष अरुण भगत, निवृत्त नेव्ही अधिकारी लेफ्टनंट आर.पी. यादव, बी.आर. पाठक, अॅड. जयश्री अकोलकर, माजी व्हाईस अॅडमिनल बालाचंद्रन, कॅप्टन डेलॉन कमांडर हुशियार सिंग, रमेश पोखरिया समशेरसिंग, धीरज गुसाई, राजेंद्रसिंग भिस्त, जगदीश प्रसाद उपस्थित होते. यावेळी आर.पी. यादव यांनी शारीरिक स्वास्थ्याकरिता आवश्यक व्यायाम, सूर्यनमस्कार, योगासने, प्राणायाम, मुद्रा याबाबत मार्गदर्शन केले.(वार्ताहर)सुषमा पाटील शाळेत योगाभ्यास जागतिक योग दिनानिमित्त कामोठे येथील सुषमा पाटील विद्यालयात नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी योगाभ्यास केला. सुषमा पाटील विद्यालयाचे चेअरमन दिलीप पाटील, सचिव मंदार पनवेलकर, विश्वस्त अर्जुन गोवारी, मुख्याध्यापक बबन काटकर, मोहिनी वाघ, अशोक गोवारी, भाजपाचे शहराध्यक्ष डॉ. अरुण भगत, अॅड. आशा भगत, मनीषा जाधव उपस्थित होते. मोहिनी वाघ यांनी योगसाधनेची प्रात्यक्षिकासह माहिती दिली.
विद्यार्थ्यांना योगाभ्यासाचे धडे
By admin | Updated: June 22, 2016 02:16 IST