लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : सहा वर्षाच्या मुलीची हत्या करून महिलेने आत्महत्या केल्याची घटना घणसोली गावात घडली आहे. महिलेने आजारपणाला कंटाळून हे कृत्य केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. याप्रकरणी रबाळे पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
घणसोली येथील चिंचआळी परिसरात गुरुवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. त्याठिकाणी राहणारे महादेव कांबळे हे रात्रपाळीवरून घरी आले असता घरामध्ये त्यांना पत्नी व मुलीचा मृतदेह नजरेस पडला. प्रियांका कांबळे (२५) व वैष्णवी कांबळे (०६) अशी दोघींची नावे आहेत. प्रियांका यांना बीपीसह इतर काही आजार असल्याने त्या मानसिक तणावात होत्या. बुधवारी रात्री पती कामावर गेल्यानंतर रात्री घरी माय लेकी दोघीच होत्या. यावेळी प्रियांका यांनी लेक वैष्णवीचा गळा आवळून हत्या केली. त्यानंतर स्वतः ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
घटनेची माहिती मिळताच रबाळे पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. तर प्रियांका यांनी नैराश्यातून हे कृत्य केल्याचे प्रथमदर्शनी समोर आले असून अधिक तपास सुरू असल्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांनी सांगितले.