बिर्लागेट : संपूर्ण राज्यासह कल्याण तालुक्यात ४ जुलैला शाळाबाह्य मुलांचे सर्व्हेक्षण करण्यात आले. त्यामध्ये सुमारे १७२ मुले आढळून आली. यापैकी तब्बल १२३ विद्यार्थ्यांना शाळेत दाखल करण्यात आले. परंतु यातूनही ४३ मुलांचे स्थलांतर झाल्याने अद्यापही ६ मुलांना शाळेत दाखल न केल्याने आल्याने या मुलांचा शाळा प्रवेशाचा श्रीगणेशा कधी होणार? याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.विटभट्टी मजूर, ऊसतोड कामगार, झोपडपट्टी कामगार, दगडखाणी मजूर आदी असंघटीत लोकांच्या मुलांना शिक्षणाचा मुलभूत हक्क मिळाळा त्यांची मुले प्राथमिक शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून शिक्षण विभागाने राज्यात ४ जुलै रोजी सर्वच शाळाबाह्य मुलांचे सर्व्हेक्षण केले. सकाळी ७ ते सायंकाळी ७ या वेळेत हे सर्व्हेक्षण करण्यात आले. याकरीता महापालिका, जिल्हा, तालुका, गाव स्तरांवर समन्वयासाठी समित्या स्थापन करण्यात आल्या. सुमारे १०० घरांसाठी एक सर्व्हेक्षण अधिकारी, २० सर्व्हेक्षण अधिकाऱ्यांवर १ झोनल २० झोनल अधिकाऱ्यांवर एक नियंत्रक अशी रचना करण्यात आली. त्यानुसार कल्याण तालुक्यात ४०० शिक्षक, २६ मुख्याध्यापक, ८ केंद्रमुख, ३ शिक्षण विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, बीडीओ यांच्यासह २०२० अंगणवाडी कार्यकर्त्या आणि १०० व्या आसपास खाजगी शिक्षक, कर्मचारी यांच्या सहकार्याने कल्याण तालुक्यात शाळा बाह्य मुले शोधण्यात आली यामध्ये १७२ मुले सापडली.खोणी केंद्रात ८, गुरवली १०, म्हारळ २०, गोवेली २, खडवली ७, मामणोली १२, सोनारपाडा ८८ आणि दहिसर २५ अशी एकूण १७२ शाळाब्ह्य मुलांपैकी १२३ विद्यार्थ्यांना शाळेत दाखल करण्यात आले तर खोणी २, गुरवली १, गोवेली १, सोनारपाडा १ आणि दहीसर १ अशी ६ मुले अद्याप शाळेच्या बाहेरच आहेत.तर सापडलेल्या मुलांपैकी ४३ मुलांनी पुन्हा स्थलांतर केले असल्याचे उघड झाले आहे. यामध्ये खोणी केंद्रात ३, म्हारळ १३, सोनारपाडा १२ आणि दहिसर १५ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. आतापर्यंत विविध स्तरांवर शाळाबाह्य मुलांची गणना झाली. स्वयंसेवी संस्था, सर्व शिक्षा अभियानांतर्गत सर्व्हेक्षण झाले. मात्र शाळाबाह्य मुलांची ठोस आकडेवारी राज्याकडे नाही. कोणत्याही बाह्य यंत्रणेकडून २००५ नंतर सर्व्हेक्षण झाले नाही. २०१३-१४ मध्ये शाळाबाह्य मुलांची संख्याकेवळ ३७ हजार ८२४ इतकी असल्याचे सांगण्यात आले. मात्र शाळेचा पट वाचविण्यासाठी, उपस्थिती आता, पोषण आहाराचे अनुदान घेण्यासाठी पट फुगविला जातो. परिणामी शाळाबाह्यमुलांची संख्या कमी आढळते. प्रत्यक्षात ही संख्या ८ ते ९ लाखांच्या घरात असण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करतात. अशीच परिस्थिती कल्याणमध्येही आहे. कारण प्रत्येक घर, गजबजलेल्या वस्त्या, झोपडपट्ट्या, बसस्थानके, रेल्वेस्थानके, सार्वजनिक ठिकाणे, बाजार, खेडेगाव, वाडी, पाडे, तांडे, शेततळे, जंगल, गुन्हातगर, गावाबाहेरची पाल, वीटभट्ट्या, दगडखाणी, मोठी बांधकामे, स्थलांतरीत कुटुंबे, भीक मागणारी मुले तमाशा कलावंतांची वस्ती, अस्थायी निवारा, भटक्या जमाती अशा असंख्य ठिकाणी आजही शाळाबाह्य मुले सापडण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे अशा शाळाबाहेरील मुलांचा शाळा प्रवेशाचा श्रीगणेशा केव्हा होणार असे पालक विचारीत आहेत.
शाळाबाह्यमुलांचा प्रवेशाचा श्रीगणेशा कधी?
By admin | Updated: September 22, 2015 03:38 IST