- वैभव गायकर, पनवेलराज्य शासनाच्या निर्देशानुसार सिडकोने खारघर सेक्टर - २१ मध्ये २००७ साली ग्रामविकास भवनच्या कामाला सुरु वात केली. दोन वर्षांत हे काम पूर्ण होणे अपेक्षित होते, मात्र निधीच्या कमतरतेमुळे आणि इतर कारणांमुळे हे काम रेंगाळले. २०११ साली इमारत बांधून तयार झाली, मात्र सभागृह व अंतर्गत सजावटीच्या कामासाठी लागणारा निधी शासनाकडून उपलब्ध न झाल्याने भवनचे काम रखडले. प्रकल्पाच्या बांधकामाला सुरुवात होऊन जवळजवळ ९ वर्षांचा कालावधी झाला असून, हा प्रकल्प अद्याप उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे . ग्रामविविकास भवनच्या रखडलेल्या कामाला गती मिळावी म्हणून सिडकोने शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज्य विभागाकडे पत्र पाठवून निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्यानुसार शासनाने ६ कोटी रु पयांचा निधी उपलब्ध करून देण्याचे मान्य केले. यापैकी काही निधी संबंधित विभागाने सिडकोकडे उपलब्ध करून दिला होता. ही सर्व प्रक्रिया पूर्ण होऊनदेखील अद्याप ग्रामविकास भवनच्या उद्घाट्नाला मुहूर्त मिळताना दिसत नाही. तळ अधिक पाच मजली या ग्रामविकास भवनमध्ये लोकनियुक्त सदस्यांना प्रशिक्षण देण्यासाठी ५७ खोल्यांची व्यवस्था, ५०० व्यक्ती बसू शकतील एवढ्या क्षमतेचे सभागृह तसेच १२० व्यक्तींसाठी स्वयंपाकगृह, भोजन कक्ष, बचत गटांसाठी ३३ दुकाने आणि कार्यालय व इतर सुविधा असणार आहेत. सिडकोने यासंदर्भात १८ कोटी रुपयांच्या वर या कामाची निवीदा काढली होती. आयवीआरसीएल इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट लिमिटेड या कंपनीला संबंधित ग्रामविकास भवनचे काम देण्यात आले आहे . आघाडी शासनाच्या कालावधीत ग्रामविकास भवनच्या कामाला मंजुरी मिळाली व कामाला सुरु वातदेखील झाली, मात्र विविध अडथळ्यांमुळे या ग्रामविकास भवनच्या कामाचा उद्घाटनाचा मुहूर्त टळला. खारघर शहरामध्ये गोल्फ कोर्स, सेंट्रल पार्क अशा आंतराष्ट्रीय प्रकल्पाचा समावेश आहे. त्यात ग्रामविकास भवनसारख्या प्रकल्पामुळे राज्यभरातील लोकनियुक्त सदस्य प्रशिक्षण घेण्यासाठी खारघरमध्ये येणार आहेत. लोकप्रतिनिधींना चांगल्या प्रकारे प्रशिक्षण देण्याचे काम या ठिकाणी केले जाणार आहे .
‘ग्रामविकास’ला प्रतीक्षा उद्घाटनाची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2016 01:00 IST