नवी मुंबई : जीएसटीतील असुसूत्रता, डिझेल आणि पेट्रोलच्या वाढत्या किमती या निषेधार्थ आॅल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट असोसिएशनने सोमवारपासून दोन दिवसीय देशव्यापी आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाच्या दुस-या दिवशी, म्हणजेच मंगळवारी वाशी येथील ट्रक टर्मिनल येथे चक्काजाम केले. त्यानंतर धरणे धरून घोषणाबाजी करण्यात आली.दुपारी एपीएमसी ते कळंबोली दरम्यान भव्य रॅली काढून वाहतूकदारांनी आपल्या मागण्याचा पुनर्विचार केला. पेट्राल आणि डिझेलच्या दरात होणारी अनियंत्रित वाढ ही वाहतूकदारांच्या मुळावर बसणारी आहे. त्यावर नियंत्रण आणावे, जीएसटी कर प्रणालीत सुसूत्रता आणावी, महामार्ग आणि टोलनाक्यावर वाहतूकदारांना पिडणाºया घटकांचा बंदोबस्त करावा आदी मागण्या करण्यात आला. सकाळी चक्काजाम आंदोलनानंतर काढण्यात आलेल्या रॅलीची कळंबोली येथील ट्रक टर्मिनलवर सांगता करण्यात आली. या आंदोलनात फेडरेशन आॅफ बॉम्बे मोटार ट्रान्सपोर्ट आॅपरेटरर्स, बॉम्बे गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशनसह अनेक संघटनांनी पाठिंबा दिला होता.
वाशीत वाहतूकदारांचे चक्काजाम आंदोलन आणि घोषणाबाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 03:10 IST